सातारा, ३० डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील ६ नगरपालिकांमध्ये २७ डिसेंबरपासून मुख्याधिकार्यांनी प्रशासकीय कारभार हाती घेतला आहे. नगरपालिका निवडणूक घोषित होऊन आचारसंहिता लागू होईपर्यंत मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत कार्यकारी समितीच्या वतीने नगरपालिकेचा कारभार चालणार आहे.
नगरविकास विभागाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील पाचगणी आणि महाबळेश्वर नगरपालिका वगळता इतर ६ नगरपालिकेतील नगरसेवकांचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे या नगरपालिकांवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सातारा, रहिमतपूर, कराड, फलटण, म्हसवड आणि वाई या नगरपालिका मुख्याधिकार्यांना जिल्हा प्रकल्प संचालक अभिजित बापट यांनी लेखी आदेश दिले आहेत. सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पालिकेची सूत्रे हाती घेत कामकाजाला प्रारंभ केला आहे. पाचगणी आणि महाबळेश्वर पालिकांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपत आहे. याठिकाणी १ जानेवारी २०२२ या दिवसापासून मुख्याधिकारी प्रशासक म्हणून काम पहाणार आहेत.
हिवाळी अधिवेशनामध्ये ओबीसी आरक्षण प्रश्नावर पालिका निवडणुका ४ मास पुढे ढकलण्याच्या विषयाला सर्वपक्षीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आचारसंहिता साधारण वर्ष २०२२ पर्यंत लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तोपर्यंत मुख्याधिकारीच नगरपालिकेचा कारभार संभाळणार आहेत. |