‘हे कृपाळू गुरुमाऊली, कोरोना महामारीच्या रूपाने थैमान घातलेल्या या घोर आपत्काळात तुमची अपार प्रीती सदैव अनुभवायला देऊन तुम्ही आमच्यावर जी कृपा केली, ती कृतज्ञताभावाने तुमच्या चरणी अर्पण करत आहे.
१. साधिकेच्या कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यावर गुरुमाऊलींनी साधकांच्या माध्यमातून जेवण आणि आवश्यक वस्तू घरपोच देऊन सर्व काळजी घेणे
‘८.५.२०२१ या दिवशी मला थोडासा ताप आला. माझी कोरोनाची चाचणी केल्यावर अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला; परंतु गुरुमाऊलीच्या कृपेने माझ्या आजाराचे स्वरूप गंभीर नव्हते. आमच्यासाठी (मी, माझ्या सासूबाई आणि माझा नातू आर्य यांच्यासाठी) आश्रमातून प्रसाद-महाप्रसाद पाठवण्याची व्यवस्था केली गेली. साधकांनी आम्हाला सर्व वस्तू घरपोच आणून दिल्या. आम्हाला घराचा उंबरठाही ओलांडायला लागला नाही. गुरुमाऊलींनी साधकांच्या माध्यमातून २० दिवस आमची काळजी घेतली.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय सांगण्यासह हळदीचे गरम पाणी पिणे, गुळण्या करणे आणि वारंवार वाफ घेणे आदी उपायही सांगणे
मी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकल गाडगीळ यांना संपर्क करून नामजपादी उपायांविषयी विचारले. तेव्हा त्यांनी नामजपादी उपाय सांगण्यासह ‘हळदीचे गरम पाणी पिणे, गुळण्या करणे आणि वारंवार वाफ घेणे’, असे उपायही सांगितले. त्यानंतर मी माझ्या त्रासाचे स्वरूप संबंधित साधकांना कळवले आणि त्यांनी वेगवेगळे नामजप करण्याचे नियोजन केले.
३. सासूबाई आणि नातू यांना कोरोना संसर्ग झाल्यावर गुरुमाऊलींच्या कृपेने औषधे अन् अन्य साहित्य मिळण्याची व्यवस्था होणे आणि दोघेही आजारातून लवकर बाहेर पडणे
याच कालावधीत माझ्या नातवाला कु. आर्यला ताप येऊ लागला; म्हणून मी आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांना संपर्क केला. त्या वेळी त्यांनी माझ्या सासूबाई आणि आर्य या दोघांच्या तपासण्या करून घ्यायला सांगितले. त्या दोघांचाही कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. सर्वांचे अहवाल रुग्णालयात दाखवून त्यानुसार औषधे आणि अन्य साहित्य आणून देणे, ही सर्व व्यवस्था गुरुमाऊलींच्या कृपेने झाली. आर्यला ४ दिवस ताप येणे आणि सासूबाईंना नेहमी होणारे त्रास, यांव्यतिरिक्त दोघांनाही देवाच्या कृपेने काहीही त्रास झाला नाही.
४. साधिकेला ताप आणि थकवा असतांनाही गुरुमाऊलींनी दिलेल्या शक्तीमुळे ती घरातील सर्व कामे करू शकणे
मला सर्दी आणि खोकला अल्प प्रमाणात होता; पण मला ४ दिवस ताप आल्यामुळे पुष्कळ थकवा आला होता, तरीही गुरुमाऊलींनी दिलेल्या शक्तीमुळे ‘घरातील स्वच्छता, कपडे धुणे, भांडी घासणे’, या सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतल्या.
गुरुमाऊली, या आजारपणात मला अनेक साधकांच्या माध्यमातून तुमची अथांग प्रीती अनुभवायला मिळाली. यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘माझ्यातील हा कृतज्ञताभाव शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या अंतरात जागृत ठेवा. साधकांनी आमच्यावर निरपेक्षपणे प्रेम करून आम्हाला साहाय्य केले, तसे प्रेम मलाही इतरांवर करता येऊ दे. हा देह तुमच्या सेवेत शेवटपर्यंत झिजू दे’, अशी तुमच्या चरणी आर्तभावाने प्रार्थना आहे.’
– श्रीमती सुनीता सुहास चितळे (वय ६८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), फोंडा, गोवा. (१६.६.२०२१)