योगी आदित्यनाथ यांना मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न ! – साक्षीदाराचा दावा

अन्वेषण यंत्रणांचा उपयोग हिंदु नेत्यांना गुन्हेगार ठरवण्यासाठी करणे निषेधार्ह आहे ! – संपादक

मुंबई – मुंबईतील विशेष ‘एन्.आय.ए.’ (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा) न्यायालयात चालू असलेल्या वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोट सुनावणीच्या प्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा साक्षीदाराने २८ डिसेंबर या दिवशी केला आहे. साक्षीदार हा ‘अभिनव भारत’ या संघटनेशी संबंधित आहे. त्याने तत्कालीन ए.टी.एस्.चे अधिकारी परमबीर सिंह आणि पोलीस उपायुक्त श्रीराव यांच्या संदर्भातही आक्षेप नोंदवले आहेत. इंद्रेश कुमार, योगी आदित्यनाथ, स्वामी असीमानंद, देवधर यांची नावे आपल्या जबाबात नोंदवावीत. याविषयी ए.टी.एस्. साक्षीदारांवर दबाव टाकत असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणामध्ये १५ साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली आहे.

या प्रकरणातील साक्षीदाराने न्यायालयासमोर केलेल्या खुलाशामध्ये म्हटले आहे की, जर आपण त्यांच्या म्हणण्यानुसार जबाब दिला नाही, तर आपल्या कुटुंबाला इजा पोचवण्यात येईल, तसेच आपल्या जबाबात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मोठ्या पदाधिकार्‍यांच्या नावांचा उल्लेख करावा, यासाठी ए.टी.एस्. आपल्यावर दबाव टाकत आहे, असा दावा साक्षीदाराने केला.