|
सर्वच क्षेत्रांतील भ्रष्टाचार्यांच्या संदर्भात अशी तत्परतेने कारवाई झाली, तर भ्रष्टाचाराला खीळ बसेल ! – संपादक
श्री. सागर चोपदार
मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – विनाअनुदानित खासगी शाळांमधील शिक्षकेतर पदांच्या नियुक्त्यांसाठी शिक्षण विभागातील अधिकारीच पैसे घेत असल्याची खळबळजनक माहिती स्वत: राज्य शिक्षणमंत्री बच्च कडू यांनी विधान परिषदेत दिली. हा भ्रष्टाचार संघटितपणे चालू असून ही महाराष्ट्राला लागलेली कीड असल्याची भावना बच्चू कडू यांनी व्यक्ती केली. या प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप असलेले जळगाव येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांना बच्चू कडू यांनी तडकाफडकी निलंबित केले. यापुढे शिक्षणक्षेत्रात असा भ्रष्टाचार करणार्यांवर निलंबनाची कारवाई न करता सेवेतूनच काढण्यात येईल, अशी चेतावणीही या वेळी बच्चू कडू यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यात वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन माध्यमिक ‘शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी लाखो रुपये घेऊन ७५० शिक्षकेतर नियुक्त्या केल्या’, असा आरोप आमदार किशोर दराडे यांनी लक्षवेधीद्वारे केला.
यावर भाजपचे आमदार नागोराव गाणार म्हणाले की, या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी १४ ऑगस्ट २०२० या दिवशी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे; मात्र चौकशी समितीची नियुक्ती करून १ वर्ष होऊन गेले तरी अद्याप अहवाल सादर करण्यात आलेला नाही. या प्रकरणी कह्यात घेण्यात आलेल्या नस्ती नष्ट करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे नागपूर, गोंदिया, भंडारा येथे भ्रष्टाचार चालू आहे. भ्रष्टाचार्यांना संरक्षण देण्यासाठी चौकशी समित्या नियुक्त करण्यात येत आहे.
या वेळी शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी आरोपी शिक्षणाधिकार्यांना अधिवेशन संपण्यापूर्वी निलंबित करण्याची मागणी सभागृहात केली. त्यावर बच्चू कडू यांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्या निलंबनाची घोषणा केली.
३-४ मासांत शिक्षणक्षेत्रातील ही भ्रष्टाचाराची कीड नष्ट करीन ! – बच्चू कडू, राज्य शिक्षणमंत्री
एका शिक्षकाच्या निवडीचा परिणाम शेकडो विद्यार्थ्यांवर होतो. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल २ मासांत आला नाही, तर त्या उपसंचालकांनाच निलंबित करण्यात येईल. मला ३-४ मासांचा वेळ द्या. शिक्षणक्षेत्रातील ही भ्रष्टाचाराची कीड मी नष्ट करीन.