राष्ट्रपतींना ७५ सहस्र पत्रे पाठवणार !
मुंबई – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ७५ सहस्र पत्रे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा शुभारंभ २५ डिसेंबर या दिवशी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन ११ आणि १२ जानेवारी २०२२ या दिवशी ठाणे येथे होणार आहे. युवा साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही स्वाक्षर्यांची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती को.म.सा.प.चे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी वर्ष २००४ मध्ये केंद्र शासनाच्या वतीने उपक्रम राबवण्यात आला होता. त्या अंतर्गत केंद्र सरकारने एक समिती नेमली. या समितीने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा; म्हणून ५५० पानांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता; मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कोकण मराठी साहित्य परिषद राष्ट्रपतींना ७५ सहस्र पत्रे (पोस्टकार्ड) पाठवून त्याचे स्मरण करून देणार आहे.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, मराठी भाषेने भारताच्या सांस्कृतिक-साहित्यिक इतिहासात मोलाचे योगदान दिले आहे. अशा मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळू नये, ही खेदाची गोष्ट आहे. आपण या विषयात लक्ष घालावे आणि ७ दशके प्रलंबित राहिलेला हा प्रश्न मार्गी लावावा.