विधानभवन परिसरात १ मंत्री आणि आमदार यांसह ३२ जणांना कोरोनाची लागण !
मुंबई, २७ डिसेंबर (वार्ता.) – राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत चालू आहे. अधिवेशनाचा २८ डिसेंबर हा अखेरचा दिवस आहे. असे असतांना विधीमंडळ परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला असून १ मंत्री आणि १ आमदार यांसह एकूण ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २ दिवसांत २ सहस्र ३०० जणांच्या आर्.टी.पी.सी.आर्. चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये मंत्री के.सी. पाडवी, आमदार समीर मेघे, ३ पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधीमंडळ आणि मंत्रालय येथील कर्मचारी यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर बोलतांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, विधीमंडळ आवारात प्रवेश करण्यापूर्वी प्रतिदिन कोरोनाची चाचणी करावी लागेल.
या संदर्भात बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, गर्दी वाढली आहे. ख्रिसमस, आणि नवीन वर्ष असतांना लोक काळजी अधिक घेत नाहीत. लसीकरण झाल्यावरही मास्क घालावा लागणार आहे. शाळा आणि महाविद्यालय या संदर्भातील पुढील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे.