‘सरकार हरवले आहे’, असा संदेश लिहिलेला सदरा घालून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा विधानभवनात प्रवेश !

भाजप आमदार मंगेश चव्हाण

मुंबई, २७ डिसेंबर (वार्ता.) – सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत चाळीसगाव अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विधानभवनात अनोख्या वेशभूषेत प्रवेश केला. ‘सरकार हरवले आहे, हे सरकार वसुली सरकार आहे’ या आशयाचे शब्द लिहिलेला सदरा त्यांनी परिधान केला होता.

जनतेच्या प्रश्नावर सरकार अपयशी !

आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार जनतेच्या प्रश्नावर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यात विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला असतांना सरकार त्यावर जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. शेतकर्‍यांची वीजजोडणी तोडून टाकण्यात आली आहेत. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत. सर्वसामान्य जनतेचा या सरकारवर विश्वास राहिला नाही. मुख्यमंत्री अधिवेशनात यायला सिद्ध नाहीत. हे सरकार हरवले आहे. वसुली करण्यात सरकार मग्न आहे. हे सरकार अधिवेशनही घ्यायला सिद्ध नाही.