छत्रपती शिवाजी महाराजांचा अमूल्य ठेवा आणि हिंदवी स्वराज्याचा प्रमुख जलदुर्ग असणार्‍या विजयदुर्ग किल्ल्याकडे होणारे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या रक्षणासाठी मोहीम

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘ज्याच्या हाती आरमार त्याची समुद्रावर सत्ता,’ हे मर्म ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या आरमाराची निर्मिती केली. त्यासाठी त्यांनी समुद्राच्या काठावर आणि समुद्रात जलदुर्गांची निर्मिती केली. त्या माध्यमांतून समुद्रातून स्वराज्यावर इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्दी आदींकडून होणार्‍या आक्रमणांचा बिमोड करत स्वराज्याचे रक्षण केले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ (भारतीय नौदलाचे जनक) असे म्हटले जाते.

किल्ले विजयदुर्ग !

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या या जलदुर्गांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग म्हणजे विजयदुर्ग किल्ला ! भावी पिढीमध्ये धर्माभिमान आणि राष्ट्राप्रती निष्ठा अन् जाज्वल्य अभिमान निर्माण करण्यासाठी अशा किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आज या किल्ल्यांची स्थिती दयनीय झाली आहे. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख केंद्र झालेल्या विजयदुर्ग किल्ल्याचे जतन, दुरुस्ती आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारच्या पुरातत्व विभागाने आवश्यक ती पावले उचलायला हवीत, तसेच शासनकर्त्यांनीही इच्छाशक्ती दाखवून किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करायला हवे.

संकलक : श्री. संदेश गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. संदेश गावडे

विजयदुर्ग किल्ल्याची मन विषण्ण करणारी दुरवस्था !

किल्ल्याची पहिली तटबंदी अनेक ठिकाणी कोसळलेली असणे

किल्ल्याच्या महाद्वारासमोरील पहिली तटबंदी अनेक ठिकाणी कोसळलेली आहे. किल्ल्याच्या पडकोट खुष्क (भूमीवरच्या) भागात प्रवेश करण्यापूर्वी असलेल्या तटबंदीवर वाढलेले गवत आणि झाडे दिसतात. किल्ल्यातील शिवकालीन श्री हनुमानाच्या मंदिराच्या समोरील वाटेने किल्ल्याकडे जातांना भव्य तटबंदी समोर दिसते; मात्र त्यावर गवत आणि झाडे मोठ्या प्रमाणावर वाढून तटबंदीला धोका उत्पन्न झाला आहे.

दरवाजा नसलेली जिबी

पडकोट खुष्क भागातून पुढे गेल्यावर जिबीचा दरवाजा लागतो. किल्ल्याचे हे दुसरे प्रवेशद्वार आहे. येथे ‘जिबीचा दरवाजा’ म्हणून पाटी लावलेली आहे; मात्र येथे दरवाजा दिसत नाही. दरवाजाजवळील दगडी जिन्यावर गवताचे साम्राज्य आहे.

जिबीचा दरवाजा आणि किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार यांमधील कोसळलेली दुसरी चिलखती तटबंदी !

जिबीचा दरवाजा आणि किल्ल्याचे महाद्वार यांमधील कोसळलेली तटबंदी

३ ऑगस्ट २०२० या दिवशी जिबीचा दरवाजा आणि किल्ल्याचे महाद्वार यांमधील दुसरी चिलखती तटबंदी (अनुमाने ३० ते ४० फूट) कोसळली. त्याच्या पहाणीसाठी राजकारणी, नेते आणि लोकप्रतिनिधी येथे येऊन गेल्यावर त्याची वृत्ते छायाचित्रांसह प्रसिद्ध झाली. पुरातत्व विभागानेही आश्वासने दिली; मात्र अद्याप तटबंदीचे काम करण्यात आलेले नाही.

महाद्वाराला दरवाजे नाहीत !

प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक वर्षांपासून दरवाजा नसलेले विजयदुर्गचे महाद्वार

किल्ल्याचे भूषण म्हणजे महाद्वार ! शत्रूसैन्याला महाद्वारापर्यंत येऊ न देण्यासाठी सैनिक प्राणांची बाजी लावत; मात्र सद्यःस्थितीत गडाच्या महाद्वाराला दरवाजाच नाही. हे पाहून मन विषण्ण होते.

महाद्वारासमोरील भव्य चिलखती तटबंदी झाडे आणि गवत यांनी पोखरलेली असणे

जिबीच्या दरवाजातून किल्ल्याच्या महाद्वाराकडे जातांना डावीकडे भव्य चिलखती तटबंदी दिसते. त्यावर झाडे आणि गवत वाढून ती पोखरलेली आहे. स्वच्छता न केल्यास ही तटबंदी ढासळण्याची शक्यता आहे.

पहिली कोसळलेली चिलखती तटबंदी

नगारखान्यासमोरील परिसराची दुःस्थिती

नगारखान्यासमोरील (नगारा वाजवण्यासाठी बसायची जागा) तोफांच्या मागे पोलीस चौकी आणि पुरातत्व विभाग कार्यालयाची वास्तू आहे. वास्तूच्या दोन्ही बाजूंचे बांधकाम ढासळले आहे. छप्पर मोडकळीस आले असून कौलेही पडली आहेत. यावरूनच किल्ल्याचे जतन आणि संवर्धन कशा पद्धतीने केले गेले असेल, याची कल्पना दुर्गप्रेमींना आल्यावाचून रहात नाही. नगारखान्यासमोर खलबतखाना (मोहिमेवर जाण्यापूर्वी नियोजनासाठी चर्चा करण्याची जागा) असून त्याच्याजवळ वडाचे प्रचंड झाड कोसळले आहे. त्याच्या फांद्या आणि झाडाचे तुकडे पडलेले आहेत.

टेहळणी बुरुजाच्या दुभंगलेल्या भिंती आणि दुर्लक्षित शिवमंदिर

टेहाळणी बुरुजच्या दुंभगलेल्या भिंती आणि दुर्लक्षित शिवमंदिर

खलबतखान्यासमोरील टेहळणी बुरुजाच्या ठिकाणी ध्वजस्तंभ आहे. यावर मराठ्यांचा भगवा डौलाने फडकत असे; पण आता तेथे ध्वज नाही. बुरुजाच्या भिंती गवत आणि झाडे वाढून दुभंगल्या आहेत. तेथे असलेल्या छोट्या शिवमंदिराची स्थिती खराब झाली आहे.

सदरेची तटबंदी आणि भिंती यांची झालेली विदारक स्थिती

वड कोसळून आणि गवत अन झाडे वाढून सदरेची तटबंदी आणि सदरेच्या भिंती यांची झालेली विदारक स्थिती

दारूगोळा कोठार ओलांडून पुढे गेलो की, सदर (राजसभा) लागते. तिच्या तटबंदीजवळचे वडाचे झाड ५ ऑगस्ट २०२० या दिवशी कोसळले होते. अजूनही तो वड त्याच स्थितीत आहे. वड कोसळून तटबंदी दुभंगली आहे. ती केव्हाही कोसळू शकते. सदरेच्या भिंतीत झाडांची मुळे वरपासून तळापर्यंत भिंत पोखरत गेलेली स्पष्टपणे दिसून येतात. सदरेच्या अन्य भिंतींवरही गवत आणि झाडे मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या भिंती केव्हाही कोसळू शकतात. हे दृश्य विदारक आहे.

राजदरबाराची दुर्लक्षित वास्तू

सदरेनंतर राजदरबाराची भव्य वास्तू आहे. छत्रपती शिवाजी महाराज गडावर यायचे, त्या वेळी येथे राजदरबार भरत असे. राजदरबाराचे वैशिष्ट्य म्हणजे दरबाराच्या एका टोकाकडे अगदी हळू आवाजात बोलले, तरी दुसर्‍या टोकास ते स्पष्टपणे ऐकू येते. वास्तूशास्त्र आणि ध्वनीशास्त्र यांचा उत्तम संयोग करून बांधलेली ही वास्तू हा शिवकालीन वास्तूशास्त्राचा आदर्श नमुना म्हणायला हवा. सध्या तेथील भिंतींवर गवत आणि झाडे वाढलेली असून ती वास्तूच्या बांधकामाला छेद देत आहेत. राजदरबाराची उंची आणि बांधकामातील समोरासमोरील चिर्‍याच्या भिंतींमध्ये असलेल्या खोबणी (भिंतीमध्ये लाकूड बसवण्यासाठी बनवलेली खाच) पाहिल्यावर ही वास्तू दुमजली असावी, हे लक्षात येते. राजदरबाराचे जतन अन् संवर्धन करण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास आपण अमूल्य ऐतिहासिक ठेव्याला मुकू शकतो.

निशाणकाठीच्या टेकडीवर हिंदवी स्वराज्याचा पवित्र भगवा ध्वज नाही !

निशाणकाठीच्या टेकडीवर हिंदवी स्वराज्याचा पवित्र भगवा ध्वज नाही

निशाणकाठीच्या टेकडीवर शिवरायांनी स्वहस्ते हिंदवी स्वराज्याचा पर्यायाने हिंदूंचा पवित्र भगवा ध्वज फडकावला होता. आज येथे भगवा ध्वज दिसत नाही. येथे शिवप्रेमींनी भगवा ध्वज लावण्याचा प्रयत्न केल्यास तो काढला जातो. ‘येथे भगवा ध्वज होता’, याचा पुरावा मागितला जातो. शिवरायांनी बांधलेले आणि जिंकून घेतलेले किल्ले हिंदवी स्वराज्याचे प्रतीक आहेत. म्हणून प्रत्येक गडावर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज असणे, यात चुकीचे काय आहे ? स्वतंत्र भारतात शिवरायांच्या गडावर भगवा ध्वज उभारण्यास होणारा अटकाव यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते कोणते ?

संकटप्रसंगी बाहेर जाण्याचा मार्ग असलेले धुळपांचे भुयार बंद स्थितीत

संकटप्रसंगी बाहेर जाण्याचा मार्ग असलेले धुळपांचे भुयार बंद स्थितीत (लाल वर्तुळात भुयार दाखविलेले आहे)

निशाणकाठी टेकडीच्या डाव्या बाजूच्या तटबंदीस लागून एक भुयार आहे. ते कान्होजी पुत्र तुळाजी आंग्रे यांच्यानंतरचे विजयदुर्गचे किल्लेदार सरदार आनंदराव धुळप यांच्या विजयदुर्ग गावातील घरापर्यंत जाते. संकटकाळी शत्रूने आक्रमण केल्यास किल्ल्यातील महिला आणि लहान मुले यांना तेथून सुरक्षित बाहेर काढता यावे, म्हणून भुयार सिद्ध केले होते. ते किल्ल्यातून समुद्रकाठाजवळून भूमीखालून जेथे पाण्याची पातळी न्यून असते, तेथून गावातील सरदार धुळप यांच्या घरापर्यंत जाते. सध्या भुयार बुजलेल्या स्थितीत असून त्याच्या तोंडावर झाडी वाढली आहे. तो मार्ग मोकळा केल्यास शिवकालीन इतिहासातील गोष्टींचा शोध लागू शकतो.

मंदिराविना असलेली छत्रपती शिवरायांची आराध्यदेवता श्री भवानीदेवीची मूर्ती !

चिर्‍याचे खांब आणि कौलारू छप्पर उभारून ठेवण्यात आलेली श्री भवानीदेवीची मूर्ती

निशाणकाठी टेकडीच्या पुढे पठारावर श्री भवानीदेवीची मूर्ती दिसते. मूर्तीजवळ चार चिर्‍याचे खांब आणि त्यावर छोटेखानी कौलारू छप्पर आहे. हे नंतर बांधले असावे; कारण मूर्तीभोवती पडलेल्या भिंतींचे अवशेष दिसतात, त्याअर्थी येथे पूर्वी मंदिर असावे. असे असले, तरी ‘तेथे मंदिर होते का ?’, याचा पुरावा मागितला जातो, असे स्थानिकांकडून कळले. शिवरायांचे आराध्यदैवत असलेली श्री भवानीमातेची मूर्ती मंदिराविना असणे शक्य नाही. प्रत्येक गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सरदार यांनी मंदिरे बांधल्याचा उल्लेख आढळतो. हिंदूंच्या देवतांप्रती आताच्या प्रशासनासारखा जाणवत असलेला गौणभाव शिवरायांच्या काळात असणे असंभव ! त्यामुळे तेथे मंदिर असणे अनिवार्य आहे.

‘हेलियम’चा शोध लागलेली जागा ‘हेलियमचे पाळणाघर’ दुर्लक्षित !

१८ ऑगस्ट १८६८ या दिवशी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ सर जे. नॉर्मन लॉकीयर यांनी विजयदुर्ग किल्ल्यावर ओटे बांधले. त्यावर दुर्बिण ठेवून सूर्याचा वेध घेतला. त्यांना ‘स्पेक्ट्रोग्राफ’वर ५८७.४९ नॅनोमीटर लहर लांबी (वेव्हलेंथ) असलेली एक पिवळ्या रंगाची रेषा दिसली. ‘या रेषेचा स्रोत सूर्याच्या तप्त वातावरणातील एका नवीन मूलद्रव्यापैकी असला पाहिजे’, असा निष्कर्ष काढून त्यांनी त्यास ‘हेलियम’ (ग्रीक भाषेत ‘हेलिऑस म्हणजे सूर्य’) हे नाव दिले. २५ वर्षांनी विल्यम रॅम्से या स्कॉटिश शास्त्रज्ञाने हेलियमच्या शोधावर शिक्कामोर्तब केले. पृथ्वीबाहेर सूर्यासारख्या ग्रहावर मूलद्रव्याचे अस्तित्व शोधले गेले. कालांतराने ते मूलद्रव्य पृथ्वीवरही अस्तित्वात आहे, याचा शोध लागणे, ही घटना विज्ञानाच्या इतिहासातील अद्वितीयच आहे. अशा ठिकाणी केवळ तत्संबंधी माहिती फलक लावून प्रशासनाने दायित्व झटकलेले दिसते; कारण वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या जागेचे जतन होणे आवश्यक आहे; मात्र तेथे गवत वाढलेले दिसते. जेथून सूर्याचे निरीक्षण झाले, त्या ओट्यांभोवती संरक्षक कठड्याची बांधणी दिसत नाही.

शिवकालीन चुन्याच्या घाणीकडे दुर्लक्ष

पाण्याच्या तलावाच्या बाजूला असलेल्या पश्चिमेकडील दुसर्‍या आणि तिसर्‍या तटबंदीच्या मधोमध तुटका बुरुज अन् शिवहरा बुरुज यांच्यामध्ये चुन्याची घाणी दिसते. शिवकाळात चुना, गूळ, रेती, हिरण्याचे पाणी आणि नारळाचा काथ्या विशिष्ट प्रमाणात एकत्र मिसळून ते मिश्रण चुन्याच्या घाणीत मळले जाई. या मिश्रणाने केलेले बांधकाम भक्कम असे. चुन्याच्या घाणीवर गवत वाढल्याने ती दिसेनाशी झाली आहे.

ऐतिहासिक शिवकालीन गोदीची पुसत चाललेली ओळख

ऐतिहासिक शिवकालीन गोदीची पुसत चाललेली ओळख

विजयदुर्ग किल्ल्यापासून २ – ३ कि.मी. अंतरावर शिवकालीन गोदी आहे. खाडीचे पाणी आत घेऊन आरमारी गोदी हिंदवी स्वराज्याच्या कालखंडात बनवण्यात आली होती. गोदीतून ५०० टनाची जहाजे जा-ये करत असत. युद्धात नादुरुस्त झालेल्या नौका भरतीच्या पाण्याने गोदीत नेण्यात येत. ओहोटीच्या वेळी आतील पाणी बाहेर ओढले जायचे, तेव्हा लाकडी फळ्या लावून गोदीचा प्रवेशमार्ग बंद करण्यात येत असे. त्यानंतर जहाजांची दुरुस्ती होत असे. दुरुस्त झालेली जहाजे भरतीच्या वेळी खाडीत नेली जात. सध्या गोदीची डागडुजी करून तेथे फलक लावणे आवश्यक आहे.

भारतीय पुरातत्व विभाग महाराष्ट्रातील किल्ल्यांकडे केव्हा लक्ष देणार ?

‘युनेस्को’ने (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना) जागतिक वारसा स्थळांच्या सूचीत उत्तरप्रदेश येथील आग्रा किल्ला १९८३ या वर्षी, लाल किल्ला २००७ या वर्षी, तर महाराणा प्रताप यांची कर्मभूमी असलेल्या राजस्थानमधील चित्तोडगड, कुंभाळगड, रणथांबोरगड, गागरोणगड हे ७ व्या ते १६ व्या शतकातील ६ डोंगरी किल्ले २०१३ या वर्षी समाविष्ट केले. मोगल आक्रमक हुमायूच्या कबरीला वर्ष १९९३ मध्ये जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले; मात्र शिवरायांचे किल्ले, तसेच त्यांची रायगडावरील समाधी यांचा जागतिक वारसा सूचीत समावेश झाला नाही, हे देशाचे दुर्दैवच ! हा किल्ला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित केला आहे; मात्र सद्य:स्थिती पहाता किमान ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून जपण्याचा प्रयत्न भारतीय पुरातत्व विभाग करणार का ?

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २१.१२.२०२१)

तटबंदीच्या तळाचा भाग समुद्राच्या पाण्याने पोखरला जाऊन धोकादायक झालेला दर्या बुरुज

तटबंदीच्या तळाचा भाग पोखरला गेल्याने धोकादायक बनलेला दर्या बुरुज
तटबंदीच्या तळाचा भाग समुद्राच्या पाण्याने पोखरला गेल्याने धोकादायक बनलेला दर्या बुरुज (दुसऱ्या बाजूने)

किल्ल्याच्या पश्चिमेला समुद्रात असलेल्या आणि गावाच्या दिशेने असलेल्या दर्या बुरुजाच्या तटबंदीचा तळाकडील भाग समुद्राच्या पाण्यामुळे पोखरला गेला आहे. त्यामुळे बुरुज कोसळण्याचा धोका आहे. बुरुजाला लागून असलेल्या तटबंदीच्या तळाचा भाग कोसळला आहे. तटबंदीवर झाडे वाढलेली आहेत.


हे पण वाचा : ‘विजयदुर्ग’ किल्ल्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी २९ डिसेंबरला ‘महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन’ करणार ! – हिंदु जनजागृती समिती


चला, छत्रपती शिवरायांचा वारसा जपण्यासाठी सिद्ध होऊया !

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील १२ गडकोट किल्ले हे ‘सैनिकी स्थापत्य’ आणि ‘गनिमी कावा युद्धनीती’ या संकल्पनांचा जागतिक वारसा म्हणून वर्ष २०२१ मध्ये ‘युनेस्को’ने स्वीकारल्याची वृत्ते अलीकडेच प्रसिद्ध झाली आहेत. जागतिक स्तरावर गुणगौरव प्राप्त झालेल्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मात्र त्यांच्या गडकोटांची झालेली दुरवस्था पाहून शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांच्या माना शरमेने खाली जात असल्यास नवल ते काय ! शासकीय आणि राजकीय अनास्थेच्या पार्श्वभूमीवर शिवप्रेमी अन् दुर्गप्रेमी यांना आवाहन करावेसे वाटते, ‘चला, आता आपणच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी सिद्ध होऊया !’

॥ जय भवानी ॥ ॥ जय शिवराय ॥