‘विजयदुर्ग’ किल्ल्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी २९ डिसेंबरला ‘महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन’ करणार ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची ‘किल्ले रक्षण’ मोहीम

ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची व्यक्त केली भीती ! • 

हिंदु धर्मरक्षणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या धर्मक्रांतीचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची झालेली दुरवस्था जिथे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेला लक्षात येते, तिथे सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाला का लक्षात येत नाही ? – संपादक
पत्रकार परिषदेत डावीकडून अधिवक्त्या (सौ.) अस्मिता सोवनी, बोलतांना श्री. सुनील घनवट आणि श्री. संदेश गावडे

सिंधुदुर्ग, २७ डिसेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा राष्ट्रीय स्मारक असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘किल्ले विजयदुर्ग’ ही महाराष्ट्राची अस्मिता आहे; मात्र छत्रपतींच्या महाराष्ट्रात असलेल्या या किल्ल्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पडझड झाल्याने विजयदुर्ग किल्ला पहायला जाणार्‍या दुर्गप्रेमींची मान शरमेने खाली जाते; मात्र किल्ल्यांच्या संवर्धनासाठी असलेल्या पुरातत्त्व खात्याची अनास्था चीड आणणारी आहे. राज्यातील गडकोट हा आपला ऐतिहासिक वारसा असून हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्र राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेतली आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रशासनाने तातडीने कृती करावी, याकडे लक्ष वेधण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, तसेच शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी २९ डिसेंबर या दिवशी ‘किल्ले रक्षण’ मोहिमेच्या अंतर्गत ‘महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन’ करणार आहेत, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील पत्रकार कक्षात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. संदेश गावडे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) अस्मिता सोवनी उपस्थित होत्या. परिषदेला तरुण भारत, सकाळ, पुढारी, लोकमत, सामना या दैनिकांचे, तसेच विविध वृत्तसंस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

श्री. घनवट पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण होते. हे किल्ले सध्याच्या पिढीला प्रेरणा देतात; मात्र या किल्ल्यांची योग्य देखभाल होत नसल्याने त्यांची पडझड होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ला जिंकून घेतल्यावर तेथील निशाणकाठी टेकडीवर स्वहस्ते पवित्र भगवा ध्वज फडकावला होता. आज या ठिकाणी भगवा ध्वज लावण्यास विरोध केला जात आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्यास आडकाठी कोण करत आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्यदैवत श्री भवानी मातेची मूर्ती असलेल्या किल्ल्यावरील ठिकाणी मंदिर का नाही ?’’

विजयदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक ठेवींचे संशोधन आणि संवर्धन झाले पाहिजे ! – अधिवक्त्या (सौ.) अस्मिता सोवनी, हिंदु विधीज्ञ परिषद

या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) अस्मिता सोवनी यांनी सांगितले की, येथील समुद्रात विजयदुर्ग किल्ल्यापासून ३ कि.मी. परिसरात दगडाची भिंत उभी केलेली आहे, असे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’च्या संशोधनात आढळून आले. त्याचे जतन, संशोधन आणि प्रदर्शन होणे आवश्यक आहे. याच परिसरात मराठ्यांच्या आरमाराच्या गोदी आहेत. त्यांचा वापर मराठी आरमाराच्या युद्धनौकांच्या दुरुस्तीसाठी व्हायचा. त्याचेही संशोधन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे.

विजयदुर्ग किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या मागण्या

किल्ले विजयदुर्ग

१. किल्ले विजयदुर्गची संबंधित शासकीय अधिकारी, किल्ल्यांशी संबंधित तज्ञ व्यक्ती आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्याद्वारे संपूर्ण पाहणी करून त्याचा अहवाल त्वरित देण्यात यावा.

२. विजयदुर्ग किल्ल्याची दुरुस्ती, संवर्धन आणि देखभाल यांसाठी तातडीने शासकीय निधी उपलब्ध करून मिळावा अन् त्याचे काम तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आणि तज्ञ व्यक्तींद्वारे त्वरित चालू करण्यात यावे.

३. विजयदुर्गजवळ वाघोटन खाडीच्या मुखाशी समुद्रात असलेली संरक्षक भिंत आणि आरमाराची गोदी यांचे जतन अन् संवर्धन करण्यात यावे.


किल्ले विजयदुर्ग !

हे पण वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांचा अमूल्य ठेवा आणि हिंदवी स्वराज्याचा प्रमुख जलदुर्ग असणार्‍या विजयदुर्ग किल्ल्याकडे होणारे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !


४. किल्ले विजयदुर्गविषयी आतापर्यंत ज्या शासकीय अथवा खासगी संस्था यांनी संशोधन केले आहे, त्या संशोधनाला व्यापक प्रसिद्धी दिली जावी.

५. विजयदुर्गशी संबंधित युद्धांच्या आणि स्थानांच्या इतिहासाचा समावेश पाठ्यपुस्तकांतही करण्यात यावा.

६. सिंधुदुर्ग जिल्हा, तसेच राज्यशासन यांच्या संकेतस्थळांवर विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास रोचक पद्धतीने छायाचित्रांसह प्रसिद्ध केला जावा.

७. किल्ल्याशी संबंधित शिवकालीन वस्तूंचे वस्तुसंग्रहालय किल्ल्यावर उभारले जावे.

८. विजयदुर्ग किल्ला आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाचा अभ्यास अन् पाहणी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ या गोवास्थित शासकीय संस्थेने वर्ष १९९८ मध्ये केली होती. या पाहणीमध्ये त्यांना काही महत्त्वाचे शोध लागले. त्यांनी ते प्रसिद्ध केले आहेत. या संशोधनाला आधारभूत धरून नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुढील संशोधन केले जावे.

निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांचा सकारात्मक प्रतिसाद

निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले होते. या पत्रकार परिषदेनंतर श्री. सुनिल घनवट यांनी निवासी जिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांची भेट घेऊन विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरवस्थेविषयी चर्चा केली. या वेळी भडकवाड यांना ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’द्वारे विजयदुर्गची माहिती देण्यात आली. त्यानंतर भडकवाड यांनी सांगितले की, ‘विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी करणार असून किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविणार आहोत. केंद्रीय पुरातत्त्व खात्याशी संपर्क करून याविषयी चर्चा करू.’