अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता आहेत, असे म्हटले जाते; परंतु काळानुरूप वीज हीसुद्धा मानवाची एक मूलभूत आवश्यकता होऊन बसली आहे ! सध्या महाराष्ट्रात महावितरणच्या वतीने सर्वत्र प्लास्टिक वेष्टन असलेल्या तारा बसवण्याचे काम चालू आहे. त्यासाठी सर्वत्रच्या उघड्या तारा काढण्याचे काम चालू आहे. भविष्यात प्लास्टिक आच्छादन असलेल्या वीजवाहिन्या आपल्याला सर्वत्र दिसतील.
प्लास्टिक वेष्टन असलेल्या वीजवाहक तारांमुळे वीज क्षेत्रात क्रांतीकारक पालट झालेले आपल्याला पहायला मिळतील. सध्या वीजवाहक तारांना कोणतेही आच्छादन नसल्यामुळे अनेक ठिकाणी आकडे टाकून सहज वीजचोरी केली जाते. प्लास्टिक आच्छादनामुळे उच्च दाब वीजवाहक तारांना कुणीही हात लावण्याचा किंवा त्याचे वेष्टन काढण्याचा प्रयत्न सहजासहजी करणार नाही. परिणामतः महावितरणला वीज चोरी थांबवण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळू शकते, तसेच प्लास्टिक आच्छादनामुळे वीजगळतीचे ही प्रमाण न्यून होणार आहे. महाराष्ट्राला विपुल प्रमाणात निसर्गसंपदा लाभली आहे. शेकडो किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रकिनार्यावर सतत वादळी वारे चालू असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होणे, त्यामुुळे महावितरणची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होणे, विविध ठिकाणी तारा भूमीवर उघड्या पडल्यामुळे अप्रिय घटना घडणे, असे प्रकार होत असतात; मात्र प्लास्टिकवेष्टीत वीजवाहक तारांमुळे वादळी वार्यातही अखंड वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वीजवाहक तारा भूमीच्या खालून (अंडरग्राउंड) घेण्याविषयी चर्चा झाली. या चर्चेमध्ये कोकणातील सर्वच विधानसभा सदस्यांनी सहभाग घेतला होता. सतत होणार्या हवामानातील पालटांमुळे वादळी वार्यात उघड्या तारा तुटण्याचा किंवा एकमेकांना स्पर्शून ‘स्पार्किंग’ होण्याच्या घटना नेहमी घडतात. प्लास्टिकवेष्टीत वीज वाहिन्यांमुळे ‘शॉर्टसर्किट’ला पूर्णविराम मिळून आगीचा धोका न्यून होणार आहे. प्लास्टिकवेष्टीत वीजवाहक तारांमुळे महावितरणच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चातही बचत होणार आहे, तसेच वारंवार उद्भवणार्या वरील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लागणारे मनुष्यबळही अल्प लागणार आहे. त्यामुळे महावितरणला अल्प देखभाल दुरुस्तीमध्ये अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे. महावितरणच्या वतीने प्लास्टिकवेष्टीत वीजवाहक तारांकडे आधुनिक तंत्रज्ञानाची पद्धत म्हणून पाहिले जात आहे. एक शाश्वत आणि सुरक्षित पर्याय म्हणून वीज क्षेत्रामध्ये एक क्रांतीकारक पालट घडवणारा हा प्रयोग ठरणार आहे !
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा