Ram Temple In WB : बंगालमध्ये अयोध्येप्रमाणे भव्य श्रीराममंदिर उभारणार ! – सुवेंदू अधिकारी, भाजप

भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी व बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी श्रीरामनवमी शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन करतांना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते तथा भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी बंगालमध्ये अयोध्येप्रमाणे भव्य श्रीराममंदिर उभारण्याची घोषणा केली आहे. अधिकारी म्हणाले, ‘‘श्रीरामनवमीच्या दिवशी नंदीग्राममध्ये श्रीराममंदिराची पायाभरणी केली जाईल. हे मंदिर अंदाजे १.५ एकर भूमीवर बांधले जाईल. हे मंदिर बंगालमधील सर्वांत मोठे श्रीराममंदिर असेल.’’

१. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्या म्हणाल्या, ‘‘केंद्र सरकार अशा धर्माचे पालन करत आहे, जो विवेकानंदांचा धर्म नाही. सरकार दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत आहे का ? श्रीरामनवमी येत आहे. ईद नुकतीच झाली. श्रीरामनवमी शांततेत साजरी व्हावी, अशी माझी इच्छा आहे. मी सर्व धर्मांना शांतता राखण्याचे आवाहन करते.’’

२. त्याला प्रत्युत्तर देतांना अधिकारी म्हणाले, ‘‘ममता बॅनर्जी यांच्या ‘शांतता सैनिकां’नी (मुसलमानांनी) वर्ष २०२३ मधील श्रीरामनवमीच्या वेळी विविध ठिकाणी मिरवणुकांवर आक्रमणे केली होती. ममता बॅनर्जी यांनी प्रथम त्यांना सांभाळावे. हिंदु समाज दंगली घडवत नाही. हिंदूंनी श्रीरामनवमीला घराबाहेर पडून रस्त्यावर ‘जय श्रीरामा’च्या घोषणा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दिवशी प्रत्येक हिंदू त्याच्या हाती ध्वज घेईल.’’