बलुचिस्तानच्या नागरिकांना पाकिस्तानपासून स्वतंत्र का व्हायचे आहे ?

वर्ष १५४० मध्ये भारताचा पहिला मोगल शासक बाबरचा मुलगा हुमायून याला बिहारच्या शेरशाह सूरीने युद्धात पराभूत केले. हुमायून भारतातून पळून गेला. त्याने पर्शिया, म्हणजेच इराणमध्ये आश्रय घेतला. शेरशाह सुरीचा मृत्यू वर्ष १५४५ मध्ये झाला. संधी ओळखून हुमायूनने भारतात परतण्याची योजना आखण्यास प्रारंभ केला. मग बलुचिस्तानच्या आदिवासी सरदारांनी त्याला या योजनेत साहाय्य केले. वर्ष १५५५ मध्ये बलुचिस्तानच्या नागरिकांच्या पाठिंब्याने हुमायूनने देहलीवर पुन्हा ताबा मिळवला. वर्ष १६५९ मध्ये मोगल सम्राट औरंगजेब देहलीचा शासक बनला. त्याची सत्ता पश्चिमेला इराणी सीमेपर्यंत पसरली होती; परंतु दक्षिणेत त्याला सतत मराठ्यांकडून आव्हानांना तोंड द्यावे लागत असे. त्यानंतर बलुची सरदारांनी मोगल राजवटीविरुद्ध बंड केले आणि बलुची नेता मीर अहमद याने वर्ष १६६६ मध्ये औरंगजेबाकडून बलुचिस्तानचे २ भाग कलात आणि क्वेट्टा जिंकले. बलुच कोण आहेत ?, जे त्यांच्या गनिमी काव्याच्या कौशल्यासाठी आणि लढाऊ स्वभावासाठी ओळखले जातात अन् ते पाकिस्तानविरुद्ध का लढत आहेत ?, याविषयीची सविस्तर माहिती येथे देत आहे. २ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘बलुचिस्तानचा इतिहास अनुमाने ९ सहस्र वर्षांचा, बलुच पाकिस्तानात कसे आले ?, आधुनिक बलुचिस्तानचा इतिहास १५० वर्षांचा आणि  भारताप्रमाणेच कलातमध्येही स्वातंत्र्याची मागणी झाली तीव्र’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/898502.html

६. बलुचिस्तान ११ ऑगस्ट १९४७ या दिवशी वेगळा देश; पण ब्रिटनने आणला अडथळा !

११ ऑगस्ट १९४७ या दिवशी कलात आणि मुस्लीम लीग यांच्यात एक करार झाला. यासमवेतच बलुचिस्तान एक वेगळा देश बनला. तथापि यात एक अडचण होती की, बलुचिस्तानची सुरक्षा पाकिस्तानच्या हातात होती. अखेर कलातच्या खानने १२ ऑगस्ट या दिवशी बलुचिस्तानला स्वतंत्र देश घोषित केले. बलुचिस्तानमधील मशिदीतून कलातचा पारंपरिक ध्वज फडकावण्यात आला. कलातचा शासक मीर अहमद खान यांच्या नावाने ‘खुत्बा’ (सार्वजनिक उपदेश) वाचण्यात आला; परंतु स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर अवघ्या एक मासानंतर १२ सप्टेंबर या दिवशी ब्रिटनने एक ठराव संमत केला, ज्यामध्ये म्हटले होते, ‘बलुचिस्तान वेगळा देश बनण्याच्या स्थितीत नाही. तो आंतरराष्ट्रीय दायित्व पेलू शकत नाही.’

महंमद जिना दिलेल्या शब्दांवरून वळले आणि विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला. ऑक्टोबर १९४७ मध्ये कलातच्या खानने पाकिस्तानला भेट दिली. त्याला आशा होती की, जिना त्याला साहाय्य करतील. जेव्हा खान कराचीला पोचले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सहस्रो बलुच लोकांनी त्यांचे बलुचिस्तानच्या राजासारखे स्वागत केले; परंतु त्यांच्या स्वागतासाठी कोणताही वरिष्ठ पाकिस्तानी अधिकारी पोचला नाही. हे पाकिस्तानच्या हेतूतील पालटाचे एक मोठे लक्षण होते. ताज महंमद ब्रेसिग यांनी त्यांच्या ‘बलूच नॅशनॅलिझम’ या पुस्तकात जिना आणि खान यांच्यातील भेटीचा उल्लेख केला आहे. बैठकीत जिना यांनी खान यांना ‘बलुचिस्तान पाकिस्तानात विलीन करा’, असे सांगितले. कलातच्या शासकाने ऐकले नाही. ते म्हणाले, ‘बलुचिस्तान हा अनेक जमातींमध्ये विभागलेला देश आहे. ते हे एकटे ठरवू शकत नाहीत. बलुचिस्तानचे लोक स्वतंत्र देशात रहायचे कि पाकिस्तानात सामील व्हायचे ?, हे ठरवतील.’

वचन दिल्याप्रमाणे खान बलुचिस्तानला गेले आणि त्यांनी विधानसभेची बैठक बोलावली, ज्यामध्ये पाकिस्तानात विलीनीकरणाला विरोध करण्यात आला. पाककडून दबाव वाढू लागला. प्रकरण समजून घेत खान यांनी ‘कमांडर इन चीफ ब्रिगेडियर जनरल’ परवेझ यांना सैन्याची जमवाजमव करण्यास, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांची व्यवस्था करण्यास सांगितले.

७. कलातला लष्करी साहाय्य देण्यास ब्रिटनचा नकार

जनरल परवेझ शस्त्रास्त्रे घेण्यासाठी डिसेंबर १९४७ मध्ये लंडनला आले. ब्रिटीश सरकारने पाकिस्तानच्या मान्यतेखेरीज कोणतेही लष्करी साहाय्य देणार नसल्याचे सांगितले. जीना यांना हे प्रकरण कळले होते. १८ मार्च १९४८ या दिवशी त्यांनी खारान, लास बेला आणि मकरान वेगळे करण्याची घोषणा केली. दुष्का एच्. सय्यद यांनी त्यांच्या ‘द ॲक्सेक्शन ऑफ कलात : मिथ अँड रिॲलिटी’, या पुस्तकात लिहिले आहे, ‘जिनांच्या एका निर्णयामुळे कलात सर्व बाजूंनी वेढले गेले होते. जिनांनी अनेक बलुच सरदारांना आपल्या बाजूने घेतले, ज्यामुळे खानसमोर दुसरा पर्याय उरला नाही. त्यानंतर खानने भारतीय अधिकारी आणि अफगाण शासक यांच्याकडून साहाय्य मागितले; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.’

२७ मार्च १९४८ या दिवशी ‘ऑल इंडिया रेडिओ’वर परराष्ट्र खात्याचे सचिव व्ही.पी. मेनन यांचे भाषण झाले. मेनन म्हणाले, ‘कलातच्या खानने विलीनीकरणासाठी भारतात संपर्क साधला होता; परंतु भारत सरकारने ही मागणी नाकारली.’ पुढे नंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या विधानाचे खंडण केले.

८. बलुचिस्तान २२७ दिवस स्वतंत्र; पण पुढे बंड चालू झाले !

२६ मार्च १९४८ या दिवशी पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानात प्रवेश केला. खानकडे आता जिनांच्या अटी मान्य करण्याविना पर्याय नव्हता; परंतु यामुळे बलुच लोकांच्या मोठ्या वर्गात पाकिस्तानविषयी द्वेष निर्माण झाला. बलुचिस्तान केवळ २२७ दिवसांसाठी स्वतंत्र देश राहू शकला. यानंतर खान यांचे भाऊ प्रिन्स करीम खान यांनी बलुच राष्ट्रवादींचा एक गट स्थापन केला. त्यांनी वर्ष १९४८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला उठाव केला. पाकिस्तानने तो चिरडला. करीम खानसह अनेकांना अटक करण्यात आली. तेव्हा बंड दडपले गेले असेल; पण ते कधीच संपले नाही. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी चालू झालेल्या या बंडाला नवे नेते मिळत राहिले. वर्ष १९५०, १९६० आणि १९७० च्या दशकात त्यांनी पाकिस्तान सरकारसमोर आव्हान उभे केले. वर्ष २००० पर्यंत पाकिस्तानविरुद्ध ४ वेळा बलुच बंडखोरी झाल्या होत्या.

– संजय झा, इस्लामाबाद, पाकिस्तान.             (क्रमश:)

(साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’चे संकेतस्थळ)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/899144.html