ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या हत्येचा प्रयत्न करणारा शीख तरुण पोलिसांच्या कह्यात

जालियनवाला बाग नरसंहाराचा सूड घेण्याचा प्रयत्न

डावीकडून जसवंत सिंह चैल आणि ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ (द्वितीय)

लंडन (ब्रिटन) – जालियनवाला बागेमधील नरसंहाराचा सूड घेण्यासाठी एक तरुण ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या महालात धनुष्यबाण घेऊन घुसल्याची घटना समोर आली आहे. जसवंत सिंह चैल असे त्याचे नाव असून तो १९ वर्षांचा आहे. पोलिसांनी त्याला कह्यात घेतले आहे. पोलीस त्याच्या मानसिक स्थितीची तपासणी करत आहेत. त्याला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्याने एक व्हिडिओ बनवला होता. त्यात त्याने म्हटले होते की, मला क्षमा करा. मी जे काही केले आहे, त्यासाठी मला क्षमा करा आणि मी जे काही करणार आहे, त्यासाठीही मला क्षमा करा. मी महाराणी एलिझाबेथ यांची हत्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा वर्ष १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बाग नरसंहारात ठार झालेल्यांचा सूड असणार आहे. वंशभेदामुळे त्यांना ठार करण्यात आले. मी एक भारतीय शीख आहे.