|
मुंबई, २४ डिसेंबर (वार्ता.) – शासकीय प्रकल्पांसाठी भूसंपादित करण्यात येणार्या जमिनी शेतकर्यांकडून अल्प दरात खरेदी करून शासनाकडून मिळणारा पाचपट मोबदला लाटण्यात येत आहे. यामध्ये मोठी यंत्रणा राज्यात कार्यरत असल्याचा गंभीर प्रकार २४ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. पुणे-बडोदा महमार्गासाठी भूसंपादित करण्यात आलेल्या जमिनी शासकीय अधिकार्यांच्या नातेवाइकांनी खरेदी केल्याचा गंभीर आरोप या वेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही राज्यात असे प्रकार घडत असल्याचे नमूद करत तक्रारी आलेल्या ठिकाणच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाची चौकशी करण्याची सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिली आहे.
पुणे-बडोदा महामार्गासाठी टिटवाळा (जिल्हा ठाणे) येथील परिसरातील चाळींची जागा संपादित करण्यात आली; मात्र ‘प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारा मोबदला जागामालक हिरावून घेत आहेत’, असा तारांकित प्रश्न शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी उपस्थित केला होता. यावर विविध सदस्यांनी ही गंभीर समस्या सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.