विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार !

कालावधी वाढणार नसल्याचे बैठकीतून स्पष्ट

मुंबई, २४ डिसेंबर (वार्ता.) – येथे चालू असलेले विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे निर्धारित कालवधीतच संपणार आहे. अधिवेशनाचा प्रारंभ २२ डिसेंबर या दिवशी झाला असून २८ डिसेंबर या दिवशी अधिवेशन संपणार आहे, असे विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आधीच घोषित करण्यात आले होते; मात्र नियमाप्रमाणे अधिवेशन चालू असतांना आणखी १ कामकाज सल्लागार समितीची बैठक २४ डिसेंबर या दिवशी सकाळी पार पडली. त्यामधे ‘२८ डिसेंबर या दिवशीच अधिवेशन संपणार आहे’, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, २७ डिसेंबर या दिवशी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने न होता आवाजी मतदानाने होणार आहे. या पालटलेल्या निवडणूक प्रक्रियेविषयी भाजपने अप्रसन्नता व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विधीमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली होती. ‘राज्यातील विविध विषयांवर चर्चा बाकी असून राज्य सरकारकडून उत्तरे आणि न्याय मिळणे अपेक्षित आहे’, असे सूत्र त्यांनी मांडले; मात्र राज्य सरकारने ही मागणी फेटाळून वरील निर्णय घोषित केला.