श्री. सागर चोपदार
मुंबई, २४ डिसेंबर (वार्ता.) – महिलांवरील अत्याचारांच्या विरोधातील विधानसभेत संमत झालेले ‘शक्ती विधेयक’ २४ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेतही एकमताने संमत करण्यात आले. हे विधेयक राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर ते राज्यात लागू होऊ शकेल. शक्ती विधेयकासमवेत जोड विधेयकामध्ये मात्र काही त्रुटी असल्याचे सांगून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात येणार आहे. या विधेयकामध्ये प्रत्येक जिल्ह्यात विशेष अधिवक्त्यांची नियुक्ती करणे, पीडितांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी समुपदेशन करणे, त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करणे आदींचा समावेश आहे. हे विधेयक पुढील अधिवेशनात घेण्यात येणार असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.