राज्यात ५ मासांत १ सहस्र ७६ शेतकर्‍यांच्या आत्महत्या !

विधानसभा प्रश्नोत्तरे…

श्री. बळवंत पाठक

मुंबई, २४ डिसेंबर (वार्ता.) – ‘जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत राज्यातील १ सहस्र ७६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांपैकी जिल्हास्तरीय समितीने ४९१ प्रकरणे पात्र ठरवली असून एकूण २१३ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ३७२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत, तर ४८२ प्रकरणी साहाय्याचे वाटप करण्यात आले आहे’, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २४ डिसेंबर या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात दिली. सदस्य कुणाल पाटील यांनी हा तारांकित प्रश्न विचारला होता.

मंत्री विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, नापिकी, राष्ट्रीयीकृत अथवा सहकारी बँक, तसेच मान्यताप्राप्त सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे येणारा कर्जबाजारीपणा आणि कर्ज परतफेडीचा तगादा या ३ कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा शेतकर्‍यांना देण्यात येणारे १ लाख रुपयांचे साहाय्य अल्प आहे. यामध्ये वाढ कशी करता येईल आणि शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना ४ लाख रुपयांचे साहाय्य कसे करता येईल ? याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून धोरण ठरवण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.