सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांच्या नावे ‘फेसबूक’वर बनावट खाते सिद्ध करून पैशांची मागणी केल्याच्या प्रकरणी राजस्थानमधील एकाला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नावे ‘फेसबूक’वर बनावट खाते सिद्ध करून त्याद्वारे लोकांकडे पैशांची मागणी करणार्‍याला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली, तसेच न्यायाधिशांच्या नावे बनावट ‘फेसबूक’ खाते सिद्ध करून पैसे मागणार्‍यालाही माढा पोलिसांनी कह्यात घेतले आहे. देवकरण हनुमानसिंग रावत आणि मोनुकुमार नथुसिंग पाल, अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. (गुन्हेगारांची वाढती मुजोरी ! गुन्हेगार आता अधिकार्‍यांच्या नावांचा वापर करण्यासही घाबरत नाहीत, असे सर्वसामान्य जनतेला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)

१. जानेवारी २०२१ मध्ये जिल्ह्यातील एका न्यायाधिशांच्या नावे ‘फेसबूक’वर बनावट खाते सिद्ध करून त्यांचे मित्र, नातेवाईक आणि ओळखीचे लोक यांना ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवली होती. त्याप्रमाणे २ व्यक्तींनी अनुक्रमे १० सहस्र आणि ७ सहस्र रुपये ‘फोन पे’ आणि ‘गूगल पे’ यांच्या माध्यमातून खात्यावर पाठवले होते. या फसवणूक प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

२. ऑक्टोबर २०२१ मध्ये सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नावे बनावट ‘फेसबूक’ खाते सिद्ध करून त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्ती यांना खात्यावर पैसे पाठवण्यास सांगण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे.