सातारा, २२ डिसेंबर (वार्ता.) – गत २ वर्षांपासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे; परंतु वारकरी संप्रदायाने या काळात जिद्द, चिकाटी, जिज्ञासा आणि भगवंताच्या नामस्मरणाच्या जोरावर कोरोनाचा सामना केला आहे. भगवंताच्या नामस्मरणात अनंत ताकद आहे, असे प्रतिपादन शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. इंद्रजित देशमुख यांनी केले.
कराड (जिल्हा सातारा) येतील मारुतीबुवा कराडकर मठाच्या वतीने वैकुंठवासी भगवानमामा कराडकर यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त आयोजित पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते. या वेळी ह.भ.प. बंडातात्या कराडकर, मठाचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘कोरोनाकाळात रुग्णांना प्राणवायू अल्प पडत होता. तेव्हा माणसाला भगवंताने विनामूल्य दिलेल्या प्राणवायूचे मूल्य लक्षात आले. वारकर्यांनी भगवद्भक्ती, नामस्मरण, चिंतन-मनन यामध्ये लक्ष केंद्रीत केल्यामुळे कोरोनाची झळ त्यांना अल्प प्रमाणात बसली.’’