साधकांनो, ‘सनातनच्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु आणि बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांच्याप्रमाणे भक्तीसत्संगांचा लाभ आपण घेतो का ?’, याचा अंतर्मुख होऊन विचार करा !

‘गेल्या ५ वर्षांपासून साधकांसाठी ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्संगांचे आयोजन करण्यात येत आहे. (सत्संगाचा प्रवास आता भावाकडून भक्तीकडे झाल्याने आता या सत्संगाचे नामकरण ‘भक्तीसत्संग’ असे केले आहे.)

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. वयस्कर असूनही सत्संग ऐकण्याची तीव्र तळमळ असणार्‍या मंगळुरू येथील सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी (वय ८४ वर्षे) !

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी एकही भक्तीसत्संग चुकवत नाहीत. त्यांना रात्री लवकर झोपायची सवय आहे; परंतु ज्या रात्री ९.३० वाजता भक्तीसत्संग असतो, त्या रात्री पू. आजी लवकर जेवून थोडी विश्रांती घेतात आणि सत्संगाच्या १५ मिनिटे आधी उठतात. सत्संग ऐकण्याच्या तीव्र तळमळीमुळे सत्संगाच्या वेळी त्यांना कधीच झोप येत नाही. अशा प्रकारे आतापर्यंत सत्संगातील एकही वाक्य त्यांनी चुकवले नाही. त्यांनी संतपद प्राप्त केलेले असूनही सत्संगाविषयीचा त्यांचा भाव आणि तीव्र तळमळ शिकण्याजोगी आहे.

२. लहान वयातही सत्संगाचे माहात्म्य कळल्याने नियमितपणे भक्तीसत्संग ऐकणारे सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) !

पू. भार्गवराम भरत प्रभु

पू. भार्गवराम प्रभु नियमितपणे पूर्ण भक्तीसत्संग ऐकतात. सत्संग संपल्यावर ‘सत्संग का संपला ? पुन्हा लाव. मला आणखी ऐकायचे आहे’, असे ते सांगतात. सत्संग चालू असतांना घरातील सदस्यांपैकी कुणी अन्य विषयांवर बोलत असेल अथवा कुणाला झोप लागली असेल, तर पू. भार्गवराम सतर्कतेने त्यांना सांगतात, ‘‘सत्संग चालू आहे. आपल्याला सत्संग ऐकायचा आहे.’’ ‘एवढ्या लहान वयातही त्यांना सत्संगाचे माहात्म्य कळते’, हे यातून लक्षात येते, तसेच त्यांचा या सत्संगांप्रतीचा भावही शिकायला मिळतो.

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी आणि पू. भार्गवराम यांच्यासारखी भक्तीसत्संगाप्रतीची तळमळ अन् भाव किती साधकांमध्ये आहे ?

साधकांनो, ‘पुढे घोर आपत्काळात हे सत्संग आपल्याला मिळतील कि नाही ?’, हे ठाऊक नाही. त्यामुळे आता मिळत असलेल्या या दैवी भक्तीसत्संगांचा आणि त्यांतील प्रत्येक सूत्राचा अंतःकरणापासून लाभ करून घ्या आणि गुरुकृपा संपादन करण्यासाठीच्या दैवी भक्तीपथावर आनंदाने मार्गक्रमण करा !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१८.१२.२०२१)