पणजी – माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी २१ डिसेंबर या दिवशी पर्ये मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले. पर्ये मतदारसंघातील मतदारांच्या आग्रहामुळे हा निर्णय घेतल्याचे आमदार प्रतापसिंह राणे यांचे म्हणणे आहे.
Separated by parties, Vishwajit Rane prepares to take on father in Poriem https://t.co/xUA3ISWbir
— TOI Goa (@TOIGoaNews) December 21, 2021
आमदार प्रतापसिंह राणे यांच्या घोषणेनंतर लगेच त्यांचा मुलगा तथा भाजपचा नेता आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘१० वेळा आमदार म्हणून निवडून आलेले माझे वडील प्रतापसिंह राणे यांनी पर्ये मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या उमेदवारीवर लढवायचे ठरवल्यास मी भाजपचा उमेदवार या नात्याने त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीत मी १० सहस्र मताधिक्क्यांनी जिंकणार आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘माझे वडील प्रतापसिंह राणे वयोमानामुळे मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्याने मी मागील २० वर्षे पर्ये मतदारसंघात काम करत आहे. काँग्रेसचे नेते आणि काही कार्यकर्ते प्रतापसिंह राणे यांची दिशाभूल करून त्यांना पर्ये मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास सांगत आहेत. प्रतापसिंह राणे यांनी सर्वकाही साध्य केले आहे. सध्या गोव्यात काँग्रेसची स्थिती दयनीय झालेली असल्याने प्रतापसिंह राणे निवडून आल्यास त्यांना कोणतेही पद मिळणार नाही.’’