‘नाशिकला आमच्या बागेत अनेक प्रकारच्या जास्वंदी फुललेल्या होत्या. माझ्या दारासमोरच पिवळ्या रंगाची पण आत लालसर (गर्द गुलाबी) रंगाचा चांदवा असलेली जास्वंद पुष्कळ बहरली होती. प्रतिदिन किमान ६० हून अधिक फुले झाडावर असायची. ती माझी फार लाडकी जास्वंद होती; मात्र तिच्या फांद्या शेजारच्या सोनारकाकांच्या बागेत जरा पसरायला लागल्या. झाडाची फुले कोमेजून दुसर्या दिवशी खाली पडून त्याचा पुष्कळ कचरा व्हायचा. कोमेजलेल्या फुलांवर असंख्य चिलटे बसायची. ती मग दिवसभर घरातही फिरायची. कोमेजल्यावर फुले चिकट होत. त्यावर चुकून पाय पडलाच, तर माणूस घसरून खाली पडायचीही शक्यता असायची. त्यामुळे सोनारकाका या फांद्या कापण्याविषयी मला सारखे सांगत होते; मात्र फाद्यांवरच्या असंख्य कळ्या पाहून मी काकांना ‘एवढ्या कळ्यांची फुले होऊ देत. काही दिवसांनी फुलांचा बहर न्यून होईल. नंतर फांद्या कापते’, असे सांगत असे.
राग अनावर झाल्याने जास्वंदीच्या फांद्या कापून टाकणे आणि ही कृती विकृत असल्याची नंतर जाणीव होणे
बरेच दिवस होऊनही मी फांद्या न कापल्यामुळे एकदा सोनारकाका संतापले आणि मला त्यांनी ‘आताच्या आता फांद्या कापून टाक’, असे सुनावले. त्यामुळे माझाही राग अनावर झाला आणि मी झाड कापायची कात्री अन् कोयता यांनी झाडाच्या फांद्या कापून टाकल्या.
१० – १२ फूट उंचीचे झाड मी अगदी अडीच तीन फूट करून टाकले. ती माझी कृती म्हणजे राग अनावर झाला की, माणूस किती विकृतपणे वागतो, याचे ते मूर्तीमंत उदाहरण होते. पश्चात्ताप तर लगेचच झाला; पण आता पश्चात्ताप करून काहीही उपयोग नव्हता.
पावसाच्या दिवसांत झाड पुन्हा वाढणे; मात्र त्याला एकही फूल न लागणे
पावसाचे दिवस होते. झाड पुन्हा भराभर वाढले. आश्चर्य म्हणजे एकही फांदी सोनारकाकांच्या बागेच्या दिशेने वाढली नाही. पाने हिरवीकंच आणि टवटवीत होती; पण एकही फूल नव्हते. त्याच्या आसपासच्या झाडांवर असंख्य फुले होती. जास्वंदीच्या या झाडावर खते आणि औषधे मारणे, असे सर्व काही प्रयोग झाले. ६ मास उलटले आणि माझी अस्वस्थता वाढली. सोनारकाकांना ही घटना सांगितली. त्यांनाही पुष्कळ वाईट वाटले.
झाडाची प्रतिदिन क्षमा मागण्यास आरंभ केल्यावर काही दिवसांतच जास्वंद कळ्यांनी बहरणे
एक दिवस कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातील ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वतीदीदी यांचा दूरभाषवरून संपर्क झाला. त्यांना झाडांविषयी बरीच माहिती होती. त्यांना मी जास्वंदीच्या झाडाची कथा सांगितली. त्यावर सरस्वतीदीदी म्हणाल्या, ‘‘या झाडाची प्रतिदिन ठराविक वेळेला क्षमा मागायची. झाडाला कुरवाळायचे, तसेच इतरही गप्पा मारायच्या.’’ झाडाची क्षमा मागण्याचा माझा कार्यक्रम चालू झाला. पहिल्या दिवशी थोडे कृत्रिम वाटले; पण जसजसे दिवस वाढत गेले, तसतशी माझ्या बोलण्यात आणि स्पर्शात एक व्याकुळता आपोआपच यायला लागली. तिला फुले कधी येतील, या उत्सुकतेपेक्षा आमच्या दोघींमध्ये एक वेगळे नाते निर्माण झाले. ते मला अधिक महत्त्वाचे वाटले. १० – १२ दिवस होऊन गेले. एके दिवशी सकाळी जास्वंदीच्या पानामागे एक कळी लपून बसलेली दिसली. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर ४ दिवसांतच जास्वंद कळ्यांनी बहरली. फुलेही उमलू लागली. मग मात्र खात्री पटली की, जास्वंदीने मला खरोखर क्षमा केली आहे. त्यानंतर जास्वंदीशी हितगुज करतांना मी म्हणाले, ‘‘आता जन्मात अशी कधी मी वागणार नाही.’’
– भारती ठाकूर, नर्मदालय, लेपा पुनर्वास (बैरागढ), जिल्हा खरगोन, मध्यप्रदेश.