परस्पर संमतीने बर्‍याच कालावधीसाठी शारीरिक संबंध ठेवून लग्नाला नकार दिल्यास त्याला फसवणूक म्हणता येणार नाही !

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल !

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – परस्पर संमतीने बर्‍याच कालावधीसाठी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार दिल्यास त्याला फसवणूक म्हणता येणार नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने एका प्रकरणामध्ये तरुणाला दोषी ठरवल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने पालटला आहे. या प्रकरणामध्ये प्रेयसीने तिच्या प्रियकराविरोधात याचिका प्रविष्ट केली होती. लग्नाचे आश्वासन देऊन प्रियकराने शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार दिल्याचा आरोप तरुणीने केला होता. यानंतर संबंधित तरुणावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या प्रकरणामध्ये १९ फेब्रुवारी १९९९ या दिवशी अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्यायामूर्तींनी प्रियकराला बलात्काराच्या आरोपामधून निर्दोष मुक्त केले; मात्र फसवणुकीच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवण्यात आले.

प्रियकराने या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकल खंडपिठासमोर झाली. साक्षी, पुरावे, जबाब आणि युक्तीवाद ऐकल्यावर त्या दोघांमध्ये ३ वर्षांपासून नातेसंबंध असल्याचे स्पष्ट झाले. महिलेने दिलेल्या जबाबावरून तिची फसवणूक करून तिच्यासमवेत शरीर संबंध ठेवल्याचे दिसून आलेले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. थोडक्यात परस्पर संमतीने दोन्ही सज्ञान व्यक्तींनी संबंध ठेवले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला फसवणुकीच्या आरोपामधूनही मुक्त केले.