प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीमाता यांनी श्री. भांभूकाका जोशी यांच्याकडील मुलाचा (आताचे प.पू. दास महाराज यांचा) स्वतःचे मूल म्हणून स्वीकार करणे

प.पू. दास महाराज यांचे खडतर बालपण आणि प.पू. भगवानदास महाराज अन् पू. रुक्मिणीमाता या विरागी दांपत्याने त्यांचा केलेला सांभाळ !

२१.१२.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात आपण प.पू. दास महाराज यांचे माता-पिता पू. रुक्मिणीमाता आणिप.पू. भगवानदास महाराज यांनी केलेल्या खडतर साधनेविषयी जाणून घेतले. ‘या दांपत्याची श्री. भांभू जोशी यांच्याशी भेट होणे, त्यांनी श्री. भांभू जोशी यांच्याकडील मुलाचा (आताचे प.पू. दास महाराज यांचा) स्वीकार करणे’ यांविषयी आजच्या अंकात पाहूया.

(भाग ३)

मागील भाग २. पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/536908.html

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

२ ई. प.पू. भगवानदास महाराज यांनी श्रीरामाच्या मंदिराचे निर्माणकार्य करणे

२ ई १. श्रीरामनामाचा जप करण्यासाठी प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांना लोकांनी मंदिरात बसू न देणे, त्यामुळे महाराजांनी मंदिरापुरती जागा ठेवून स्वतःची भूमी विकणे अन् तेथे मंदिर उभारणे : ‘भगवान श्रीधरस्वामींनी सांगितल्याप्रमाणे आई आणि महाराज यांनी १३ कोटी श्रीरामनामाचा नामजप चालू केला. आई आणि महाराज दिवस-रात्र जप करत असत. ते गावातील मंदिरात बसून नामजप करत; पण लोक त्यांना मंदिरातून बाहेर काढायचे आणि ‘इथे बसू नका’, असे त्यांना म्हणायचे. त्यामुळे महाराजांनी मंदिरापुरती जागा ठेवून स्वतःची सगळी भूमी आणि आमराई विकली अन् त्या पैशांमधूनच मंदिराची उभारणी केली.

२ ई २. प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांनी मंदिरात बसून एकांतात श्रीरामनामाचा जप करणे : वर्ष १९२८ मध्ये मंदिर बांधले. महाराजांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि कुलदेवी श्री भवानी यांच्या मूर्ती अन् विरूपाक्ष लिंग नेपाळहून आणले. कुलदेवी श्री भवानीची मूर्ती आणि तिच्यासमोर लिंग, हे मंदिराच्या तळघरात होते आणि राम, लक्ष्मण अन् सीता यांच्या मूर्ती मंदिराच्या वरच्या बाजूला होत्या. बाहेरच्या बाजूला समोर मारुतीचे मंदिर होते. त्या मंदिरामध्ये एकांतात बसून नामस्मरण आणि ध्यान करण्यासाठी एक खोली बांधली होती. (या मंदिरात परात्पर गुरु डॉ. आठवले येऊन गेले आहेत. तिथे त्यांची दोन प्रवचने झाली आहेत.) महाराज आणि आई तिथेच रामनामाचा जप करत असत. महाराज कधी राममंदिरातील एका देवळीत (भिंतीतील कोनाड्यात) बसून, तर कधी विहिरीमध्ये कमरेएवढ्या पाण्यात उभे राहून घंटोन्घंटे नामजप करत असत. आई विहिरीतील लहानशा देवळीत बसून नामजप करत असत.

२ उ. श्रीरामाचा १३ कोटी नामजप करतांना आलेले विघ्न आणि भगवान श्रीधरस्वामी यांनी सांगितलेले उपाय

२ उ १. प.पू. भगवानदास महाराज विहिरीतील पाण्यात उभे असतांना एका नागाने त्यांच्या कमरेला विळखा घालणे, लोक किंचाळल्यामुळे नागानेही घाबरून महाराजांच्या पायाला दंश करणे : एकदा गावातील एकाचा विवाह झाल्यानंतर पाच-पन्नास लोक मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्या वेळी लोकांनी तेथील विहिरीत पाहिले, तर त्यांना दिसले की, महाराज पाण्यात उभे आहेत, त्यांच्या कमरेला एका मोठ्या नागाने विळखा घातला आहे आणि त्याचा फणा महाराजांच्या तोंडवळ्यासमोर आहे. हे दृश्य पाहून लोक घाबरून किंचाळले. त्यामुळे नाग बिथरला आणि त्याने महाराजांच्या पायाला दंश केला.

२ उ २. नागाने दंश करूनही सद्गुरुकृपेने महाराजांच्या पायाला केवळ सूज येणे आणि ‘रामनामाचा ३ कोटी जप पूर्ण होऊनही असे विघ्न का आले ?’, असे महाराजांना वाटणे : नागाने दंश करूनही सद्गुरुकृपेने महाराजांचा मृत्यू झाला नाही. त्यांच्या पायाला केवळ सूज आली. त्यांना विषबाधा झाली नाही. त्या वेळी महाराजांना वाटले, ‘आपण तर गुरूंच्या आज्ञेने १३ कोटी श्रीरामनाम जपाचा संकल्प केला आहे. ३ कोटी श्रीरामनाम जप पूर्णही झाला आहे. मग मधे हे असे विघ्न का आले ?’

२ उ ३. ‘उपासना चालू करण्यापूर्वी कुलदेवी श्री भवानीमाता हिच्यासमोर नारळ ठेवून प्रार्थना न केल्याने देवी अप्रसन्न आहे’, असे श्रीधरस्वामींनी सांगणे : वर्ष १९४३ मध्ये हे विचारण्यासाठी महाराज आणि आई सज्जनगडावर भगवान श्रीधरस्वामींकडे गेले. त्या वेळी त्यांनी स्वामींना घडलेला प्रसंग सांगितल्यावर स्वामींनी २ सेकंद डोळे बंद केले आणि ध्यानातून पाहिले. त्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘उपासना चालू करण्यापूर्वी कुलदेवी श्री भवानीमाता हिच्यासमोर नारळ ठेवून प्रार्थना केली नाही. त्यामुळे देवी अप्रसन्न आहे; म्हणून हे विघ्न आले आहे.’’

२ उ ४. स्वामींनी कुलदेवीची क्षमा मागून आणि प्रार्थना करून परत नव्याने १३ कोटी नामजपाला प्रारंभ करण्यास सांगणे : त्या वेळी भगवान श्रीधरस्वामींनी महाराजांना सांगितले, ‘‘कुलदेवीची क्षमा मागून तिच्यासमोर नारळ ठेवा आणि तिला प्रार्थना करून पुन्हा उपासना चालू करा.’’ भगवान श्रीधरस्वामींनी पुन्हा नव्याने पहिल्यापासून १३ कोटी नामजपाला प्रारंभ करण्यास सांगितले.

२ उ ५. महाराजांच्या पायाची सूज आणि दोष नाहीसा होण्यासाठी स्वामींनी महाराज अन् आई यांना रत्नागिरी येथे समुद्राच्या पाण्यात उभे राहून १ लाख गायत्रीचा जप करण्यास सांगणे : महाराजांना नागाने दंश केल्यामुळे त्यांच्या पायाला आलेली सूज आणि होणार्‍या वेदना न्यून करण्यासाठी अन् दोष नाहीसा होण्यासाठी १३ कोटी श्रीरामनाम जप चालू करण्याआधी स्वामींनी महाराज आणि आई यांना रत्नागिरी येथे जाऊन समुद्राच्या पाण्यात उभे राहून १ लाख गायत्रीचा जप करण्यास सांगितले होते. त्यानंतर महाराज आणि आई स्वामींचे रत्नागिरी येथील एक शिष्य श्री. पांडुरंग आगाशे यांच्याकडे रहायला गेले. त्याच आळीत टिळकवाडीत श्री. भांभूकाका जोशी यांचेही घर होते. तिथल्या राममंदिरात महाराजांचे प्रवचन चाले. त्याच वेळी महाराज आणि भक्तमंडळी यांनी मिळून १ कोटी रामनामाचा जप पूर्ण केला होता.

प.पू. भगवानदास महाराज आणि प.पू. रुक्मिणीबाई

३. महाराज आणि आई यांनी श्री. भांभूकाका जोशी यांच्याकडील मुलाचा स्वीकार करणे

३ अ. महाराजांची साधना पाहून श्री. भांभू जोशी यांच्या मनात ‘आपल्याकडचे मूल यांच्या झोळीत घातले, तर योग्य होईल’, असा विचार येणे : त्याच वेळी रत्नागिरीत सज्जनगडावरील लोक समर्थांच्या पादुका घेऊन आले होते. त्यांचे आणि महाराजांचे तेथील मंदिरात प्रतिदिन प्रवचन चालू होते. त्या वेळी श्री. भांभूकाका जोशी प्रतिदिन मंदिरात प्रवचन ऐकण्यासाठी जात असत. त्या वेळी महाराजांची साधना, तपस्या, वैराग्य आणि तेज पाहून श्री. भांभूकाकांच्या मनात विचार आला, ‘आपल्याकडचे मूल यांच्या झोळीत घातले, तर फार योग्य होईल.’

३ आ. श्री. भांभू जोशी यांनी महाराजांना मुलाविषयी विचारल्यावर त्यांनी ‘भगवान श्रीधरस्वामींना विचारून सांगतो’, असे सांगणे : श्री. भांभू जोशी यांनी महाराजांना विचारले, ‘‘तुम्ही या अनाथ मुलाला तुमच्या झोळीत घ्याल का ? याची कुंडली सांगते, ‘हे मूल सांसारिकांना दगा देणार. त्यांच्याजवळ रहाणार नाही. ज्या दोन व्यक्तींनी या मुलाला घेतले होते, ती दोन माणसे दगावली आहेत.’’ त्यावर महाराज म्हणाले, ‘‘मी माझे गुरु भगवान श्रीधरस्वामींना विचारून सांगतो.’’

३ इ. पू. मारुतिबुवा रामदासी आणि इतर गुरुबंधू यांनी सांगितल्याप्रमाणे महाराज अन् आई यांनी त्या मुलाचा स्वीकार करणे : त्या वेळी तिथे समर्थांच्या पादुका घेऊन आलेले पू. मारुतिबुवा रामदासी, गोडसेबुवा आणि आगाशेबुवा हे सगळे महाराजांचे गुरुबंधू होते. त्यांनी महाराजांना सांगितले, ‘‘तुम्ही मूल घ्या. हे स्वामींचेच नियोजन नसेल कशावरून ? त्यांनीच तुम्हाला इथे येऊन १ लाख गायत्रीचा जप करायला सांगितला आणि तुमचा एक कोटी श्रीरामनाम जपही पूर्ण झाला. तुम्हाला मूलबाळही नाही. हा गुरूंनी दिलेला प्रसादच आहे, तर नको कशाला म्हणता ?’’ महाराजांनी ते मान्य केले. त्यानंतर श्री. भांभूकाका जोशी यांनीच कुंडलीत आल्याप्रमाणे माझा तुलादान विधी करून एक नक्षत्रशांती केली आणि मला प.पू. भगवानदास महाराज अन् पू. रुक्मिणीआई यांच्या झोळीत घातले.

३ ई. सगळ्या रामदासी लोकांनी मुलाचे नाव ‘रघुवीर’, असे ठेवणे : श्री. जोशीकाकांनी माझे नाव ‘चंदू’ ठेवले होते. त्यांनी मला महाराज आणि आई यांच्या झोळीत घातल्यानंतर माझा नामकरण विधी करण्यात आला. महाराजांनी रामदासींना विचारले, ‘‘आता या मुलाचे नाव काय ठेवायचे ?’, ते सुचवा.’’ त्या वेळी रामदासी लोकांनी पुढील श्लोक म्हटला.

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

नंतर ते रामदासी म्हणाले, ‘‘या मुलाचे नाव ‘रघुवीर’ ठेवा !’’ मग त्या सगळ्या रामदासींनीच माझे नाव ‘रघुवीर’, असे ठेवले आणि बायकांनी पाळणा हालवला.

३ उ. महाराजांनी रघुवीरला झोळीत घेतल्यावर त्यांना ४० दिवस विषमज्वराचा त्रास होणे आणि गुरुकृपेने त्यांचे प्राण वाचणे : महाराजांनी मला झोळीत घेतले. त्यानंतर काही दिवसांत त्यांना तीव्र विषमज्वर झाला. त्यांना ४० दिवस तो त्रास सोसावा लागला; पण त्यांची साधना आणि सद्गुरुकृपा यांमुळे त्यांचे प्राण वाचले अन् त्यांना बरे वाटू लागले.

४. महाराज आणि आई रघुवीरला घेऊन रत्नागिरीहून गळदग्याची वाडी येथे घरी येणे आणि तेथे त्यांनी १५ वर्षांत १५ कोटी रामनामाचा जप पूर्ण करणे

ही गोष्ट वर्ष १९४३ मधील होती. त्या वेळी मी एक वर्षाचा होतो. त्यानंतर महाराज आणि आई मला रत्नागिरीहून गळदग्याची वाडी (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक) येथे घरी घेऊन आले. यानंतर महाराज आणि आई यांनी मिळून १५ कोटी रामनामाचा जप पूर्ण केला. त्याला १५ वर्षे लागली आणि त्या नामजपातच मी लहानाचा मोठा झालो.’

(क्रमशः)

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२०)