साधनेसाठी एकप्रकारे संन्यासी जीवन अंगीकारलेले दांपत्य, प.पू. दास महाराज यांचे माता-पिता पू. रुक्मिणीमाता आणि प.पू. भगवानदास महाराज !

२०.१२.२०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन विधी झाला. त्यानिमित्ताने…

१९.१२.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात आपण प.पू. दास महाराज यांच्या बालपणातील काही खडतर अनुभव पाहिले. आजच्या अंकात प.पू. दास महाराज यांचा सांभाळ करणारे विरागी दांपत्य प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीमाता यांनी केलेल्या कठोर साधनेविषयी जाणून घेऊया.

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/536418.html

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

२. प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीमाता यांनी केलेली खडतर साधना !

२ अ. प.पू. भगवानदास महाराज यांची गावात ‘सावकार’ म्हणून ओळख असणे : ‘प.पू. भगवानदास महाराज यांचे मूळ गाव गळदगे (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक) हे होते. तिथे त्यांचे स्वतःचे मोठे घर, बागायत आणि एक आमराई होती. त्यांची शेतीही पुष्कळ होती, तसेच त्यांचे स्वतःचे २ ट्रक होते. गावात त्यांची ‘सावकार’ म्हणून ओळख होती.

प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीमाता

२ आ. दुसरा विवाह झाल्यावर आलेल्या अनुभवानंतर महाराजांना वैराग्य येऊ लागणे आणि पू. रुक्मिणीआई यांनीही त्यांना तशीच साथ देणे : प.पू. भगवानदास महाराज यांचे दोन विवाह झाले होते. पहिली पत्नी म्हणजे पू. रुक्मिणीआई. तिला मूलबाळ न झाल्याने तिच्या अनुमतीनेच महाराजांनी दुसरा विवाह केला. त्यानंतर त्यांना कळले की, जिच्या समवेत विवाह झाला आहे, ती परिचारिका असून चांगल्या वळणाची नाही. त्यानंतर महाराजांनी तिचा संपर्क सोडून दिला. नंतर वर्षभरातच तिचा मृत्यू झाला. त्या वेळी महाराजांना वाटू लागले, ‘संसारात काही सुख नाही, तर कशाला हा व्यर्थ खटाटोप करायचा ?’ त्यांना एकप्रकारे वैराग्य येऊ लागले होते. पू. रुक्मिणीआईंनीही त्यांना तशीच साथ दिली. त्यानंतर आई आणि महाराज ‘आई आणि मुलगा’, या भावानेच आयुष्यभर राहिले.

२ इ. भगवान श्रीधरस्वामी यांच्या आज्ञेप्रमाणे साधना आणि सेवा करणे

२ इ १. भगवान श्रीधरस्वामींची प्राप्ती आणि दर्शन झाल्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार साधना करणे अन् कोरडी भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे : प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांनी एकप्रकारे संन्यासच स्वीकारला होता. भगवान श्रीधरस्वामींची प्राप्ती आणि दर्शन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आज्ञेनुसार सेवा, साधना अन् नामस्मरण चालू केले. भगवान श्रीधरस्वामी समर्थ संप्रदायाचे असल्याने त्या संप्रदायानुसार प.पू. भगवानदास महाराज कोरडी भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागले.

२ इ २. पू. रुक्मिणीआईंनी महाराजांच्या समवेत गळ्यात झोळी बांधून भिक्षा मागण्यासाठी जाणे : त्यानंतर पू. रुक्मिणीआईही महाराजांच्या समवेत गळ्यात झोळी बांधून भिक्षा मागण्यासाठी जाऊ लागल्या. महाराजांच्या गळ्यात एक झोळी आणि पू. रुक्मिणीआईंच्या गळ्यात एक झोळी असायची. पू. रुक्मिणीआई पूर्ण शहरात ती झोळी घेऊन फिरायच्या. यातून ‘त्यांच्या मनाची साधना करण्याची पुष्कळ सिद्धता होती’, हे लक्षात येते. प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई ५ घरी भिक्षा मागायचे. दोन्ही वेळा ते भिक्षेमध्ये धान्य, गूळ, बटाटे इत्यादी घेत असत. ते भिक्षा देणार्‍या बाईला सांगायचे, ‘‘एकदाच काय ते झोळीत घाला.’’ मग ते मिळालेल्या भिक्षेतील एक मूठ धान्य त्या बाईच्या ओटीत घालायचे.

२ इ ३. नऊ कप्प्यांच्या एका झोळीत सर्व शिधा आणि दुसर्‍या झोळीत भाजी गोळा करणे : महाराजांच्या झोळीला ९ कप्पे असायचे. ‘एका कप्प्यात तांदुळ, दुसर्‍या कप्प्यात तुरीची डाळ, तिसर्‍या कप्प्यात गूळ’, असे सर्व पदार्थ या कप्प्यांत ठेवलेले असायचे. त्या कप्प्यांवर या पदार्थांची नावे लिहिलेली असायची. आईंकडे असलेल्या झोळीत सगळ्या प्रकारची भाजी असायची. त्यांना जे काही भिक्षेत मिळायचे, ते सगळे एकत्र करून भिजत घालून ते खात असत.

२ इ ४. भिक्षा मागतांना पू. रुक्मिणीआई यांच्या आईंच्या भेटीचा योग येणे आणि मुलगी अन् जावई यांना भिक्षा मागतांना पाहून पू. रुक्मिणीआई यांच्या आईंना धक्का बसून चक्कर येणे : पू. रुक्मिणीआई यांचे वडील इनामदार होते. त्यांच्याकडे भरपूर भूमीही होती. ते मोठे शासकीय अधिकारी (सुपरिटेंडंट) होते. बढती मिळाली असल्याने त्यांना पुष्कळ मान होता. त्या वेळी त्यांना ५०० रुपये (आताचे १ – २ लाख रुपये) वेतन होते. कर्मधर्मसंयोगाने एकदा आई आणि महाराज भिक्षा मागत इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे पोचले. त्या वेळी पू. रुक्मिणीआई यांचे वय ४० वर्षे होते. महाराजांचे सासरे (आईंचे वडील) इचलकरंजीच्या हेड (मुख्य) पोस्टामध्ये अधिकारी (सुपरिटेंडंट) म्हणून आले होते. ‘समर्थ संप्रदायाचा रामदासी आला असेल’, असा विचार करून सासूबाई भिक्षेत घालण्यासाठी तांदुळ आणि सर्व शिधा घेऊन आल्या. मुलगी आणि जावई यांना पाहून सासूबाईंना एकदम धक्का बसला आणि त्या चक्कर येऊन पडल्या. ‘बुवाने अधीक्षकाच्या बायकोला काहीतरी केले असेल’, असे वाटून गावातील लोकांनी पोलिसांना कळवले. त्यामुळे तेथे दोन पोलीस आले. ‘मुलगी आणि जावई भिक्षेसाठी आलेले पाहून आपली पत्नी चक्कर येऊन पडली आहे’, हे महाराजांच्या सासर्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी गावकरी अन् पोलीस यांना समजावून पाठवून दिले. त्या वेळीही आई झोळी घेऊन उभी राहिल्या होत्या.

२ इ ५. समर्थांचा श्लोक म्हणून गावोगाव फिरून शिधा गोळा करणे आणि वर्षभराचे धान्य गोळा करून ते सज्जनगडावर पोचवणे : समर्थ संप्रदायाचे लोक अजूनसुद्धा समर्थांचे श्लोक म्हणत असतात. ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।’ असा श्लोक म्हणतच ते गावात जातात. त्याप्रमाणे महाराज आणि आई गावोगावी फिरले. या वर्षी राजस्थानमध्ये, पुढच्या वर्षी गुजरातमध्ये, तिसर्‍या वर्षी खानदेशमध्ये जायचे, असे त्यांचे नियोजन असायचे. सज्जनगडावर ९ दिवस दासनवमीचा उत्सव असायचा. ते वर्षभराचे धान्य ट्रकने आणून सज्जनगडावर पोचवायचे. त्यात गहू, रवा, तांदूळ असे सगळे असायचे.

२ इ ६. तेरा कोटी ‘रामनाम’ जपाचा संकल्प करणे : भगवान श्रीधरस्वामींच्या मार्गदर्शनानुसार प.पू. भगवानदास महाराज यांनी १३ कोटी ‘रामनाम’ जपाचा संकल्प केला होता. त्यानुसार प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई मिळून तो नामजप करत होते.’

(क्रमशः)

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.२.२०२१)

या पुढील भाग ३. पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/537168.html