बांदा, २० डिसेंबर (वार्ता.) – अखंड दास्यभावात राहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी एकरूप झालेले प.पू. दास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन शांती विधी सोहळा २० डिसेंबर २०२१ या दिवशी अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पानवळ-बांदा येथील गौतमारण्य आश्रम परिसरातील श्रीराम पंचायतन मंदिरात झालेल्या या दिव्य सोहळ्याला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, कवळे, गोवा येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक आणि प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक या संतत्रयींची उपस्थिती लाभली.
प.पू. दास महाराज यांनी ८० वर्षे पूर्ण केली आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा सहस्रचंद्रदर्शन शांती विधी करण्यात आला. विधीनिमित्त रविवार, १९ डिसेंबर या दिवशी गणपतिपूजन, पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, आचार्यवरण हे विधी करण्यात आले. नंतर ‘वयोमानपरत्वे इंद्रियांची क्षमता उणावते, ती क्षमता टिकून रहावी, यासाठी विधी करत आहोत’, असा संकल्प या वेळी करण्यात आला. सोमवार, २० डिसेंबर या दिवशी सकाळी ब्रह्मादी मंडलदेवता आवाहन, मुख्य देवता स्थापना, अग्निस्थापना, नवग्रहदेवता आवाहन, पूजन, नवग्रह देवतांसाठी हवन, प्रधान देवतांसाठी हवन आणि ब्रह्मादी देवतांसाठी हवन करण्यात आले. शेवटी प.पू. दास महाराजांच्या हस्ते पूर्णाहुती देण्यात आली. या सर्व विधींचे पौरोहित्य रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझे गुरुजी आणि पाठशाळेतील अन्य पुरोहित, तसेच पानवळ येथील पुरोहित श्री. सुरेश डेगवेकर आणि श्री. नितेश साधले यांनी केले. मुख्य विधीनंतर प.पू. दास महाराज यांचा गुळाने तुलाभार करण्यात आला. सायंकाळच्या वेळी पर्वरी येथील भक्तमंडळींनी प.पू. भक्तराज महाराज रचित भजन गायनाची सेवा केली. रात्री आरवली येथील सुप्रसिद्ध गायक श्री. शेखर पणशीकर आणि त्यांचे सहकारी यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम झाला. साधारण २५० जणांनी या सोहळ्याचा लाभ घेतला.
प.पू. दास महाराज यांचे मार्गदर्शनप.पू. दास महाराज मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘आज हिंदु धर्माला ग्लानी आली आहे. धर्मावर चोहोबाजूंनी आक्रमणे होत आहेत. परात्पर गुरुदेवांच्या रूपातून भगवंताने धर्मसंस्थापनेचे कार्य आरंभ केले आहे. धर्मरक्षणासाठी आपण सर्वांनी प्रतिदिन किमान एक घंटा वेळ द्यावा.’’ या वेळी प.पू. दास महाराज यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. |
सन्मान सोहळ्यातील क्षणचित्रे
१. सद्गुरु सत्यवान कदम यांनी प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) यांचा सन्मान केला.
२. प.पू. दास महाराज यांनी सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान केला.
३. पू. (सौ.) माईंनी पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा सन्मान केला.