काँग्रेसची गोव्यात दयनीय स्थिती : काँग्रेसच्या आमदारांची संख्या पोचली २ वर
पणजी, २० डिसेंबर (वार्ता.) : काँग्रेसचे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी २० डिसेंबर या दिवशी आमदारकीचे त्यागपत्र विधीमंडळ सचिवांकडे सुपुर्द केले. आलेक्स रेजिनाल्ड तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने चार दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली सूची प्रसिद्ध करून यामध्ये कुडतरी मतदारसंघातून आलेक्स रेजिनाल्ड यांना उमेदवारी घोषित केली होती. यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आलेक्स रेजिनाल्ड आमदारकीचे त्यागपत्र देऊन दुपारी विमानाने कोलकाता येथे गेले. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ. शंतनू सेन आणि आमदार तपस चटर्जी यांनी कोलकाता विमानतळावर आलेक्स रेजिनाल्ड यांचे स्वागत केले. आलेक्स रेजिनाल्ड २१ डिसेंबर या दिवशी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
आलेक्स रेजिनाल्ड हे विद्यमान विधानसभेत आमदारकीचे त्यागपत्र देणारे सहावे आमदार ठरले आहेत. यापूर्वी काँग्रेसचे लुईझिन फालेरो आणि आमदार रवि नाईक; ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार जयेश साळगावकर, अपक्ष आमदार रोहन खंवटे, भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी आमदारकीचे त्यागपत्र देऊन अन्य पक्षांत प्रवेश केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी विधीमंडळ पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. आलेक्स रेजिनाल्ड गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसवर नाराज होते; मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी त्यांची समजूत काढून त्यांचे मन वळवले होते. यानंतर आलेक्स रेजिनाल्ड यांना काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्षपदही बहाल करण्यात आले होते. आलेक्स रेजिनाल्ड सध्या काँग्रेस पक्षात सक्रीय दिसत असतांनाच त्यांनी २० डिसेंबर या दिवशी अचानकपणे पर्वरी येथे विधानसभेच्या सभापतींच्या कार्यालयात जाऊन आमदारकीचे त्यागपत्र दिले. सभापती राजेश पाटणेकर कार्यालयात उपस्थित नसल्याने विधीमंडळ खात्याच्या सचिव नम्रता उलमन यांच्याकडे त्यांनी त्यागपत्र सुपुर्द केले.
काँग्रेस पक्ष १७ वरून २ वर
वर्ष २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ उमेदवार जिंकून आले होते; मात्र वर्ष २०२१ सरत असतांना काँग्रेसच्या आमदारांची संख्या आता केवळ २ वर पोचली आहे. गोव्यात काँग्रेसची एवढी दयनीय स्थिती कधीच झाली नव्हती.
काँग्रेसने आजपर्यंत अनेक महापूर, वादळे आणि त्सुनामी झेलल्या आणि पक्ष त्यातून यशस्वीपणे बाहेर पडला ! दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते
याविषयी काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, ‘‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती.’ काँग्रेसने आजपर्यंत अनेक महापूर, वादळे आणि त्सुनामी झेलल्या आहेत आणि पक्ष त्यातून यशस्वीपणे बाहेर पडला आहे. संधीसाधूंचा पराभव करण्यास आम्ही सक्षम आहोत.’’ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, ‘‘रेजिनाल्ड हे अस्थिर आणि अपरिपक्व नेते आहेत. ते निवडणुकीआधीच गेले ते बरे झाले. निवडून आल्यावर गेले असते, तर ते पक्षाला महागात पडले असते.’’
भाजपचे रामराव वाघ यांचा ‘आप’मध्ये प्रवेश, तर मये येथील ‘मगोप’चे संभाव्य उमेदवार प्रेमेंद्र शेट यांचा भाजपात प्रवेश
वर्ष २०१७ च्या निवडणुकीतील सांत आंद्रे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामराव वाघ यांनी २० डिसेंबर या दिवशी ‘आप’मध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा भाजपवासी झाल्यानंतर ते पक्षावर नाराज होते. आगामी निवडणुकीत फ्रान्सिस सिल्वेरा यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर रामराव वाघ यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याला ‘आप’ हाच एक सक्षम पर्याय असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रामराव वाघ यांच्याकडे कला अकादमीच्या थिएटर आर्ट महाविद्यालयाचे प्राचार्यपद, तसेच अन्य काही पदे आहेत. भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने त्यांना ही पदे सोडावी लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
मये मतदारसंघातील मगोपचे संभाव्य उमेदवार प्रेमेंद्र शेट यांनी २० डिसेंबर या दिवशी सायंकाळी भाजपात प्रवेश केला. ‘मगोप’ने निवडणुकीसाठी १२ उमेदवार निश्चित केले होते आणि त्यामध्ये प्रेमेंद्र शेट यांचाही समावेश होता. विधानसभेचे माजी सभापती दिवंगत अनंत शेट यांचे ते बंधू होत.