अशांना कठोर शासन हवे ! – संपादक
नवी मुंबई – येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील ऑनलाईन सेवाकेंद्रातून कोरोनाच्या संसर्गावरील लसीचे बनावट प्रमाणपत्र विकणार्या ३ जणांना ए.पी.एम्.सी. पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिकेचे २ कंत्राटी कर्मचारी आणि एका ऑनलाईन सेवाकेंद्र चालकाचा समावेश आहे. नितीन शिंदे, विराज वाक्षे, अमोल झेंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींकडून ७ बनावट प्रमाणपत्रे कह्यात घेण्यात आली आहेत. ३ सहस्र रुपयांना एका प्रमाणपत्राची विक्री केली जात होती. नितीन याचे मसाला बाजारामध्ये ऑनलाईन सेवाकेंद्र आहे, तर विराज आणि अमोल हे महापालिकेच्या परिवहन उपक्रमात कंत्राटी वाहक आहेत. अमोल हा सध्या तुर्भेतील लसीकरण केंद्रावर डेटा इंट्रीचे काम करत होता. नितीन याने विराजच्या साहाय्याने अमोलला पैशांचे आमीष दाखवून पालिकेच्या लसीकरण केंद्राचा आय.डी.चा वापर केला आणि शासनाच्या संकेतस्थळावर लस घेतल्याच्या बनावट नोंदी केल्याचे आढळून आले आहे.