गुजरातमध्ये पाकिस्तानी मासेमारी नौकेतून ४०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

अमली पदार्थांसह पाकिस्तानी मासेमारी नौकेतील कर्मचारी आणि त्यांना पकडणारे भारतीय तटरक्षक दल तसेच आतंकवादविरोधी पथकातील जवान

कच्छ (गुजरात) – भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या किनार्‍यावर पाकिस्तानी मासेमारी नौका पकडून त्यातून ४०० कोटी रुपये किमतीचे ७७ किलो हेरॉईन जप्त केले आहे. ‘अल् हुसेनी’ नावाच्या या नौकेमध्ये ६ कर्मचारी सदस्य होते, अशी माहिती संरक्षण जनसंपर्क कार्यालयाने दिली. भारतीय तटरक्षक दलाने गुजरात आतंकवादविरोधी पथकासह संयुक्तरित्या ही कारवाई केली. पुढील चौकशीसाठी ही नौका गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर आणण्यात आली आहे. यावर्षी एप्रिलमध्ये तटरक्षक दल आणि आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्तपणे अशीच कारवाई केली होती आणि कच्छमधील जाखाऊ किनार्‍याजवळून ८ पाकिस्तानी नागरिकांसह आणि सुमारे १५० कोटी रुपये किमतीचे ३० किलो हेरॉईन असलेली नौका पकडली होती.