आडाळी येथील औद्योगिक क्षेत्रात उद्योग आणि व्यवसाय चालू करण्यासाठी ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

  • ७ वर्षे होऊनही औद्योगिक वसाहतीतील भूखंड उद्योजकांना देण्यात आलेले नाहीत.
  • अशी मागणी नागरिकांना करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असतांना औद्योगिक वसाहत असूनही भूखंड न देणारे प्रशासन जनताद्रोहीच !
आडाळी औद्योगिक क्षेत्र

दोडामार्ग – तालुक्यातील आडाळी औद्योगिक क्षेत्रातील (एम्.आय.डी.सी.तील) भूखंड उद्योजकांना देण्यात यावेत, तसेच येथे उद्योग चालू करावेत. येथे उद्योग उभे रहात नसल्याने स्थानिक रोजगारापासून वंचित आहेत, असा आरोप करत आडाळी ग्रामस्थांनी १९ डिसेंबरला येथे एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

आडाळी येथे औद्योगिक क्षेत्राला संमती मिळून ७ वर्षे झाली; मात्र अद्याप उद्योजकांना भूखंड देण्यास प्रारंभ करण्यात आला नाही. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने येथे केंद्रीय वनौषधी प्रकल्प उभारण्यासाठी ५० एकर भूमी देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे कामही अद्याप चालू झालेले नाही. त्यामुळे आडाळीत उद्योग येण्यासाठी एम्.आय.डी.सी.ने मुंबईत गुंतवणूक परिषद घ्यावी, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

नारायण राणे

या कालावधीत दोडामार्ग तालुका दौर्‍यावर असलेले  केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आंदोलकांची भेट घेतली अन् येत्या १५ दिवसांत आयुष प्रकल्प मार्गी लावू, आडाळीत मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले.
एम्.आय.डी.सी.चे अभियंता अविनाश रेवणकर यांनीही आंदोलकांची भेट घेतली अन् ‘भूखंड वाटप करण्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर चालू आहे. येत्या मासात रस्ते, पाण्याची सुविधा पूर्ण होतील’, असे आश्‍वासन दिले.