सातारा, १९ डिसेंबर (वार्ता.) – दक्षिण आफ्रिकेतील युगांडा येथून एकाच कुटुंबातील ४ भारतीय नागरीक फलटण येथे आले. याविषयी माहिती मिळताच आरोग्य विभागाने त्यांची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये ४ पैकी ३ जण ओमिक्रॉनबाधित असल्याचे आढळले, ४ था रुग्ण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आला. सर्वांना फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जवळच्यांची माहिती घेऊन त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली; मात्र सर्वांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. विदेशातून आपल्या आजूबाजूला कुणी नागरिक आले असतील, तर त्याविषयी तत्परतेने आरोग्य विभागाला कळवण्याचे आवाहन, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जनतेने ओमिक्रॉनची भीती बाळगू नये. कोरोनाविषयक नियम आणि सूचना यांचे तंतोतंत पालन करावे, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. |