तमिळनाडूमध्ये देवदर्शनाला गेल्यानंतर सौ. सायली करंदीकर यांना आणि त्यांचे पती श्री. सिद्धेश करंदीकर यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साक्षात् तिरुपति आहेत’, याची मिळालेली प्रचीती

‘३०.१०.२०२१ ते ८.११.२०२१ या कालावधीत मी, माझे वडील सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, आजी पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि आजोबा पू. सदाशिव परांजपे, असे ४ जण चेन्नईला गेलो होतो. माझी आई श्रीचित्‌‌शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ यांनी आम्हाला तमिळनाडूमधील देवळांच्या दर्शनांसाठी बोलावले होते. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे. त्याच वेळी माझे पती श्री. सिद्धेश करंदीकर हे गोव्याला असूनही ‘ते माझ्यासोबतच देवदर्शनाला आहेत’, अशा अनुभूती त्यांना आल्या. येथे त्यांच्या अनुभूतीही देत आहे.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ
श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. तिरुपति बालाजीच्या संदर्भात सौ. सायली सिद्धेश करंदीकर यांना आलेल्या अनुभूती

सौ. सायली करंदीकर

१ अ. स्वप्नामध्ये तिरुपति बालाजीच्या मागे त्याच्याहून मोठी अष्टभुजा देवी दिसून तिच्या मुखाच्या ठिकाणी आईचा (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा) तोंडवळा दिसणे आणि महर्षींनी नाडीपट्टीमध्ये ‘सायलीने तिरुपति बालाजीच्या आतमध्ये जे आहे, त्याचे खरे दर्शन घेतले !’, असे सांगणे : ‘आम्ही ५.११.२०२१ या दिवशी तिरुपति बालाजीचे दर्शन घेतले. त्या दिवशी पहाटे मला स्वप्न पडले. स्वप्नामध्ये मला तिरुपति बालाजीचे दर्शन झाले. तिरुपति बालाजीच्या मागे मला त्याच्याहून मोठी अष्टभुजा देवी दिसली. त्या देवीच्या मुखाच्या ठिकाणी मला आईचा (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा) तोंडवळा दिसला. हे दृश्य बघून मला आश्चर्य वाटले. बालाजीच्या मागे अष्टभुजा देवीच्या स्वरूपात मला माझी आई का दिसली, हे मला कळले नाही. याचा उलगडा आमची सर्व देवदर्शने झाल्यानंतर पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी आमच्यासाठी केलेल्या आशीर्वादाच्या नाडीवाचनामध्ये झाला.

आम्ही खरेतर मला पडलेले स्वप्न ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’चे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना सांगितले नव्हते. त्यांनी आम्हाला आशीर्वाद म्हणून आमच्यासाठी नाडीपट्टीचे वाचन केले. त्यामध्ये महर्षींनी मला पडलेल्या स्वप्नाचा उल्लेख जसाच्या तसा केला होता. महर्षि म्हणाले, ‘‘तुम्ही सर्व जणांनी केवळ तिरुपति बालाजीचे दर्शन घेतले; पण सायलीने तिरुपति बालाजीच्या आतमध्ये जे आहे, त्याचे खरे दर्शन घेतले !’’

१ आ. प्रत्यक्ष दर्शन घेतांना बालाजीच्या ठिकाणी पांढर्‍याशुभ्र वेशातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच भव्य स्वरूपात दर्शन होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कळवळून प्रार्थना केल्यावर बालाजीचे दर्शन होणे : वरील अनुभूती स्वप्नात आल्यानंतर सकाळी मी जेव्हा तिरुपति बालाजीच्या देवळात त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी गेले, तेव्हा मला बालाजीच्या ठिकाणी पांढर्‍याशुभ्र वेशातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे भव्य स्वरूपात दर्शन झाले. मला काही केल्या प्रत्यक्ष बालाजी दिसेना. तेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाच शरण जाऊन प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, तुम्ही मला इथे कशासाठी आणले आहे, तर बालाजीचे दर्शन घेण्यासाठी. तुमचे मला प्रत्यक्ष दर्शन होतेच. तेव्हा आता मला तुमच्या कृपेने बालाजीचे दर्शन होऊ दे.’ कळवळून ही प्रार्थना केल्यावर मला बालाजीचे दर्शन झाले. यातून देवाने मला दाखवून दिले, ‘बालाजी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकच आहेत !’

– सौ. सायली सिद्धेश करंदीकर, फोंडा, गोवा. (१२.१२.२०२१)

२. पत्नी सौ. सायली तमिळनाडूमध्ये देवदर्शनासाठी गेली असतांना ‘स्वतःही त्यांच्यासमवेतच आहोत’, याच्या अनुभूती श्री. सिद्धेश प्रकाश करंदीकर यांना येणे

श्री. सिद्धेश प्रकाश करंदीकर

२ अ. पत्नी सौ. सायली श्री कामाक्षीदेवीचे दर्शन घेत असतांना स्वतःला पूजेनंतर लावलेल्या गंधामध्ये देवीचा एक चरण उमटणे : ‘१.११.२०२१ या दिवशी माझी पत्नी सौ. सायली तिचे आई-बाबा आणि आजी-आजोबा यांच्यासमवेत तमिळनाडूमध्ये दौर्‍यावर गेली असतांना श्री कामाक्षीदेवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेली होती. मी त्या वेळी गोव्याला घरी होतो आणि घरच्या देवांची पूजा करत होतो. पूजेच्या वेळी मी देवांना गंध लावले आणि पूजा झाल्यावर उरलेले गंध मी प्रसाद म्हणून स्वतःला लावले. काही वेळानी मी स्वतःचा तोंडवळा आरशात पाहिला. तेव्हा माझ्या कपाळावरील गंधामध्ये एक चरण उमटल्याचे मला दिसले. तो चरण इतका स्पष्ट दिसत होता की, त्या चरणाची बोटे, चवडा, हे भागही अगदी स्पष्ट दिसत होते. त्या वेळी ‘तो देवीचाच चरण उमटला आहे’, असे मला वाटले.

२ आ. रामनाथी आश्रमात श्री सिद्धिविनायकाची पूजा करत असतांना ‘तिरुपतीच्या दर्शनाला जायला मिळावे’, असा विचार येणे, त्यानंतर गणपतीमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होऊन ‘इथेच तिरुपति बालाजी आहे’, असे शब्द कानी येणे आणि एका संतांनीही ‘इथेच (आश्रमात) आपले सगळे आहे ना !’, असे सांगणे : ३.११.२०२१ या दिवशी दौर्‍यातील सर्वजण तिरुपति बालाजीच्या दर्शनाला गेले होते. त्यांचे दर्शन चालू असतांना मी रामनाथी येथील सनातन आश्रमातील श्री सिद्धिविनायक मूर्तीची पूजा करत होतो. त्या वेळी माझ्या मनात ‘मला तिरुपतीच्या दर्शनाला जायला मिळावे’, असा विचार क्षणभर आला. त्यानंतर मला श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले आणि नंतर सोनेरी चरण दिसले. तसेच मला शब्द कानी आले, ‘इथेच तिरुपति बालाजी, म्हणजे साक्षात् महाविष्णु आहे. त्यामुळे तू किती भाग्यवान आहेस !’ हे ऐकून माझी भावजागृती झाली. यानंतर दुसर्‍या दिवशी मी एका संतांकडे एका सेवेसाठी गेलो असतांना त्यांनी मला विचारले, ‘‘तू दौर्‍यावर गेला नाहीस का ?’’ त्यावर मी म्हटले, ‘‘नाही गेलो. इथे सेवा आहेत ना !’’ यावर संत म्हणाले, ‘‘इथेच आपले सगळे आहे ना !’’ हे ऐकून ‘परात्पर गुरु डॉक्टरच साक्षात् तिरुपति आहेत’, याची प्रचीती देवाने मला दिली असल्याचे लक्षात आले.

२ इ. दौर्‍यातील सर्वजण रामसेतूच्या दर्शनासाठी गेले असतांना स्वतःला लावलेल्या गंधामध्ये शेषशायी विष्णूसारखा आकार दिसणे : ५.११.२०२१ या दिवशी दौर्‍यातील सर्वजण रामसेतूच्या दर्शनासाठी गेले होते. त्या दिवशी मी घरातील देवांची पूजा झाल्यानंतर स्वतःला प्रसादाचे गंध लावले. काही वेळाने मी माझा तोंडवळा आरशात बघितला असता त्या गंधाचा आकार शेषशायी विष्णूसारखा दिसत असल्याचे मला लक्षात आले.

मी सौ. सायलीसमवेत देवदर्शनाला न जाताही वरील अनुभूतींतून देवाने शुभसंकेत देऊन ‘देव सतत माझ्या सोबत आहे’, हे दाखवून दिले. ‘हे देवा, तुझे अस्तित्व मला असेच अखंड अनुभवता येऊ दे’, ही तुझ्या चरणी प्रार्थना !’

– श्री. सिद्धेश प्रकाश करंदीकर, फोंडा, गोवा. (१२.१२.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक