सनातन हिंदु धर्म आणि क्रांतीकारक यांच्याविषयी आंध्रप्रदेशमध्ये प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांना ख्रिस्ती प्रचारकांकडून होणारा विरोध !

कुठे दिवसागणिक हिंदु धर्म आणि देवता यांचा अवमान करणारे हिंदी चित्रपट, तर कुठे राष्ट्र, हिंदु धर्म अन् देवता यांचा गौरव करणारे ‘तेलुगु’ भाषेतील चित्रपट !

१. ‘अखंडा’ या तेलुगु चित्रपटामध्ये सनातन हिंदु धर्माचा महिमा दाखवण्यात येणे

काही दिवसांपूर्वी ‘अखंडा’ नावाचा तेलुगु चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात हिंदु धर्म आणि भगवान शिव यांचा महिमा दाखवण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये गीतेतील ‘अहिंसा परमो धर्मः’ या (अर्धवट) श्लोकाचा संदर्भ देऊन हिंदूंना पंगू बनवू पाहणार्‍यांना संपूर्ण श्लोक सांगण्यात आला आहे आणि ‘अन्याय संपवण्यासाठी केलेली हिंसा ही अहिंसाच असते’, असे ठणकावून सांगितले आहे. आपण या संदर्भातील २ मिनिटांची चित्रफीत खालील मार्गिकेवर पाहू शकतो.

२. ख्रिस्ती प्रचारकांनी ‘अखंडा’ चित्रपटाला विरोध करण्यामागील कारण

आंध्रप्रदेशमध्ये एक माणूस ‘अखंडा’ चित्रपटाने इतका प्रभावित झाला की, धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा त्याने जोरदार प्रतिवाद केला आणि ‘सनातन धर्म काय आहे’, हे जाणून घेण्यासाठी त्यांना ‘अखंडा’ चित्रपट पहाण्यास सांगितले. या चित्रपटाचे संवादही तो म्हणून दाखवतो. त्यामुळेच ख्रिस्ती प्रचारक ‘अखंडा’ चित्रपटाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत. या संदर्भातील २ मिनिटांची चित्रफीत खालील मार्गिकेवर पाहू शकतो.

३. अज्ञात क्रांतीकारकांची ओळख करून देणारा ‘आर्आर्आर्’ (राईज रोअर रिव्होल्ट – उदय, गर्जना, बंड) तेलुगु चित्रपट जगभर प्रदर्शित होण्याच्या सिद्धतेत !

‘बाहुबली’ या बहुचर्चित चित्रपटातून हिंदु संस्कृतीचे दर्शन घडवल्यानंतर दिग्दर्शक श्रीशैलम् श्री राजामौली हे ‘आर्आर्आर्’ (राईज रोअर रिव्होल्ट) नावाचा अज्ञात क्रांतीकारकांची ओळख करून देणारा चित्रपट घेऊन येत आहेत. हा चित्रपट ७ जानेवारी २०२२ या दिवशी जगभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारे अल्लुरी सीताराम राजू आणि निजामशाही विरुद्ध लढा देणारे कोमराम भीम या आंध्रप्रदेशातील दोन अज्ञात क्रांतीकारकांची जगाला ओळख करून देण्यात येणार आहे.

४. हिंदु क्रांतीकारकांविषयी प्रश्न विचारणार्‍या पत्रकाराला दिग्दर्शकाने ठामपणे उत्तर देणे

या चित्रपटाच्या संदर्भात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने श्रीशैलम् श्री राजामौली यांना प्रश्न विचारला की, तुम्ही दोन हिंदु क्रांतीकारकांना ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या विरोधात लढतांना दाखवत असल्याने वाद होणार नाही का ? यावर राजामौली यांनी ‘असे काही होईल म्हणून आपण आपला इतिहास सांगायचा नाही का ?’, असा प्रतिप्रश्न केला. तसेच ‘वाद घालणारे कशावरही वाद घालत रहातात, मी त्याची पर्वा करत नाही’, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे चित्रपटाची कथा काल्पनिक असली, तरी मूळ गाभा तोच राहील, याची शाश्वती वाटते. तसेच नुकत्याच प्रसारित झालेल्या चित्रपटाच्या काही ‘प्रोमोज’वरूनही (चित्रपटाच्या काही भागांवरून केलेल्या विज्ञापनावरूनही) तसे दिसून येते.

या चित्रपटातील ‘प्रोमोज’मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाचे हृदयद्रावक चित्रण दिसत आहे. त्यामुळे ख्रिस्ती प्रचारक, डावे, काही तथाकथित उदारमतवादी हे ब्रिटिशांना अन्यायकारक दाखवण्यात येत असल्यािवषयी दबक्या आवाजात कुरकुर करत आहेत; पण त्याला दिग्दर्शकाने सध्या तरी अजिबात भीक घातलेली नाही .

एकूणच काय तर दिग्दर्शक श्रीशैलम् श्री राजामौली यांच्या ‘आर्आर्आर्’ (राईज रोअर रिव्होल्ट) चित्रपटाचे आतापर्यंतचे प्रोमोज पहाता हा चित्रपट अज्ञात क्रांतीकारकांची ओळख करून देण्यासह प्रत्येक भारतियांमध्ये निश्चित राष्ट्रप्रेमाचे बीजही अंकुरित करील, यात तीळमात्र शंका नाही.