भारतीय उपखंडामध्ये जिहादी आतंकवादी संघटना सक्रीय ! – अमेरिका

जम्मू-काश्मीर, ईशान्य आणि मध्य भारत नक्षलवादी अन् आतंकवादी कारवायांमुळे प्रभावित झालेली क्षेत्र

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या आतंकवादावरील ‘२०२० कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम्’ या ताज्या अहवालात म्हटले आहे की, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिज्बुल मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटना भारतीय उपखंडात सक्रीय आहेत. जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत आणि मध्य भारत ही नक्षलवादी अन् आतंकवादी कारवायांमुळे प्रभावित झालेली क्षेत्र आहेत.

१. प्रतिवर्षी प्रकाशित होणार्‍या या अहवालात यंदा म्हणण्यात आले आहे की, भारत सरकारने त्याच्या सीमेवर आतंकवादी संघटना सक्रीय आहेत कि नाही, हे शोधण्यासाठी, तसेच या संघटनांना रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत; परंतु अद्यापही धोका कायम आहे.

२. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी जम्मू-काश्मीर येथे अल् कायदाशी संबंधित ‘अन्सार गजवत उल् हिंद’ या संघटनेच्या आतंकवाद्यांवर केलेल्या कारवाईची उदाहरणेसुद्धा या अहवालात देण्यात आली आहेत.

३. अहवालात म्हटले आहे की, डिसेंबरमध्ये भारताने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांच्या समवेत आणखी एक आतंकवादविरोधी सराव आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ईशान्येत नक्षलवादी गट सक्रीय आहेत; आतंकवाद्यांकडून होणार्‍या  हिंसाचाराचे प्रमाण अल्प झाले आहे. देशात खलिस्तानी गटांची सक्रीयता अल्प झाली आहे. खलिस्तान चळवळीमध्ये सहभागी असलेल्या अनेक संघटना भारताच्या सीमेतील महत्त्वाच्या कारवायांमध्ये गुंतलेल्या नाहीत, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

४. भारतीय सुरक्षा यंत्रणा आतंकवादापासून देशाला असणारे धोके रोखण्यासाठी सक्षम आहेत; परंतु भारतीय सुरक्षा दले विस्तृत सागरी आणि भू सीमा सुरक्षित करण्यासाठी मर्यादित क्षमतेचा वापर करतांना दिसतात. तसेच त्यांच्यात ताळमेळीचा अभाव आहे, असे म्हटले आहे. (अमेरिकेने दाखवून दिलेल्या या त्रुटी भारताला लक्षात आल्या का नाहीत ? कि त्यांकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही ? – संपादक)

इस्लामिक स्टेटमध्ये भारतीय वंशाचे ६६ आतंकवादी

इस्लामिक स्टेट (इसिस) या आतंकवादी संघटनेत भारतीय वंशाचे ६६ सदस्य असून त्यांची ओळख पटली आहे. वर्ष २०२० मध्ये परदेशातून कोणताही आतंकवादी भारतामध्ये परतलेला नाही, अशी माहितीही या अहवालात देण्यात आली आहे. ‘भारतातील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेसह (‘एन्.आय.ए.’सह) अन्य आतंकवादविरोधी संघटनांनी देशस्तरावर, तसेच विभागीय स्तरांवर कार्यरत असलेल्या आतंकवादी संघटनांचा शोध घेऊन त्यांच्या कारवाया वेळीच रोखल्या आहेत. ‘एन.आय.ए.’ने इस्लामिक स्टेटशी संबंधित ३४ प्रकरणांचे अन्वेषण करून १६० जणांना अटक केली’, असेही या अहवालातून सांगण्यात आले आहे.