सुश्री (कुमारी)  तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात साधकांना आलेल्या अनुभूती

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कुमारी)  तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

दत्तगुरु ही पूर्वज, तसेच वाईट शक्ती यांच्या त्रासांपासून मुक्ती देणारी देवता आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्यानंतर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले आणि आध्यात्मिक त्रास नसलेले साधक यांना सप्टेंबर २०२० मध्ये पितृपक्षाच्या कालावधीत हा नामजप ऐकवण्यात आला. त्या वेळी या प्रयोगात उपस्थित असलेल्या काही साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

कु. तेजल पात्रीकर

एक साधिका

त्रासदायक अनुभूती

१. ‘प्रयोग चालू झाल्यावर मला चिघळलेल्या जखमेसारखा दुर्गंध आला.

२. प्रयोग ज्या ठिकाणी घेण्यात आला, त्या ठिकाणी मला पुष्कळ त्रासदायक जाणवले. ‘आपण पाताळात आलो आहे कि काय ?’, असे मला वाटले.

चांगल्या अनुभूती

१. नामजपामुळे प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींची शक्ती न्यून झाली. नामजपामुळे प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून झाला.

२. अन्य साधक ‘मृत पावलेले साधक आणि त्यांचे नातेवाईक यांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने पुढची गती कशी मिळाली ?’, या विषयावर बोलत होते. ही चर्चा ऐकतांना साधकांचा भाव जागृत होत होता. त्या वेळी माझ्या मनात ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रती माझी श्रद्धा वाढायला हवी’, असा विचार आला.

३. प्रथम काही वेळ माझा नामजप श्वासाच्या समवेत होत होता. मला पुष्कळ चांगले वाटत होते. नंतर मला माझ्या मृत सासूबाईंची आठवण आली. मला त्यांच्या समवेतचे पूर्वीचे प्रसंग आठवले आणि त्यांच्या गुणांची आठवण आली. माझ्याकडून त्यांच्या संदर्भात ज्या चुका झाल्या, त्याबद्दल मी सूक्ष्मातून त्यांची क्षमा मागितली. त्यानंतर माझ्याकडून त्यांना ‘आम्हाला साधनेत पुढे जाण्यासाठी आशीर्वाद द्यावा’, अशी प्रार्थना झाली. पितृपक्षात प्रथमच मला पूर्वजांची आठवण आली.

४. प्रयोग चालू असतांना मला चाफ्याच्या फुलांचा सुगंध आला आणि वातावरणात चाफ्याप्रमाणे कोमलता जाणवली. मला गोड दैवी सुगंध आला. माझ्या तोंडात गोड चव निर्माण झाली.’

दुसरी साधिका

त्रासदायक अनुभूती

१. ‘प्रयोग चालू होण्यापूर्वीच मला जुलाब होऊ लागले. त्या वेळी माझ्या पोटात वेदना होत होत्या. प्रयोग चालू झाल्यावर मला ‘मळमळणे, जळजळ होणे, पोटात आग-आग होणे, पूर्वजांची आठवण येणे, डोके जड होणे’, असे विविध त्रास होत होते.

२. मला सूक्ष्मातून भूमीतून पुष्कळ तोंडवळे बाहेर येतांना दिसले. मी त्यांना हातांनी पुष्कळ मारले. नंतर थोड्या वेळाने माझ्या तळहाताला कंड सुटली आणि माझे तोंड कडू झाले.

३. ‘माझ्या डोळ्यांतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत’, असे मला जाणवत होते. तेव्हा माझ्या मनात ‘स्वतःचे डोळे काढून टाकूया’, असा विचार येत होता.

४. ‘कुणीतरी माझा प्राण घेत आहे’, असे मला जाणवत होते.

चांगल्या अनुभूती

१. नामजपामुळे मला आध्यात्मिक लाभ झाल्याचे जाणवले आणि मला भावावस्था अनुभवता आली.

२. माझ्या तोंडात गोड लाळ आल्याचे मला जाणवले.

३. त्या वेळी मला पुढील दृश्य दिसले, ‘परात्पर गुरुदेवांनी आम्हा सर्व साधकांकडून व्यष्टी आणि समष्टी साधना करवून घेतली. ते आम्हाला चैतन्य आणि भाव यांच्या मोठ्या नौकेतून घेऊन जात आहेत.’

तिसरी साधिका

त्रासदायक अनुभूती

१. ‘या नामजपातील चैतन्य अस्त्रांप्रमाणे मारा करणारे आहे’, असे मला जाणवले.

२. नामजप मंद आवाजात लावला असला, तरी त्याची परिणामकारकता अधिक होती. मला प्रथम माझ्या डोक्याच्या वरच्या भागावर, म्हणजे सहस्रारचक्रासहित त्याच्या सभोवतालचा भाग आणि नंतर आज्ञाचक्र यांवर नामजपाचा मारक परिणाम जाणवला. तेव्हा मला हातोडीने डोक्यावर घाव घातल्याप्रमाणे वाटत होते.

चांगल्या अनुभूती

१. जप तारक असला, तरी मोठ्या आवाजातील नामजप हा मंद आणि मध्यम आवाजाच्या तुलनेत मोठ्या वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणासाठी अधिक परिणामकारक आहे’, असे मला अन्य प्रयोगांमध्येही जाणवले होते.

२. पितृपक्षात लावलेल्या मोठ्या आवाजातील या नामजपामुळे ‘मोठ्या वाईट शक्तींवर दुहेरी अस्त्राप्रमाणे वार झाले’, असे मला जाणवले.

३. पितृपक्षात हा जप ऐकतांना ‘जपाची परिणामकारता ८० टक्के आहे’, असे मला जाणवले. ‘पितृपक्षाच्या व्यतिरिक्त एरव्ही हा नामजप केल्यास याची परिणामकारकता ६० टक्के आहे’, असे मला जाणवले.’

चौथी साधिका

त्रासदायक अनुभूती : ‘जप ऐकू येऊ नये; म्हणून प्रयोगात सहभागी झालेल्या साधिकांना त्रास देणार्‍या वाईट शक्ती विविध प्राण्यांचे, तसेच भीतीदायक आवाज काढून किंचाळत होत्या. ‘कुणी जप ऐकू नये’, यासाठी अनिष्ट शक्तींनी संघटितपणे हा कट केला होता’, असे मला वाटले.’ (‘नामजपाचा सात्त्विक नाद सहन न झाल्याने वाईट शक्ती अशा स्वरूपाचे विचित्र आवाज काढून नामजपाच्या सात्त्विक नादाशी लढतात.’ – संकलक)

– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, संगीत समन्वयक, फोंडा, गोवा. (१२.१२.२०२१)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/536736.html


 साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ‘सनातन चैतन्यवाणी’ या ‘ॲप’वर उपलब्ध आहे. आपण याचा अवश्य लाभ घ्यावा. या नामजपाविषयीची माहिती आपले कुटुंबीय, आप्त आणि स्नेही यांनाही सांगावी, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करा :  https://www.sanatan.org/Chaitanyavani

हा नामजप ऐकतांना आपणास काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास ‘[email protected]’ या संगणकीय पत्त्यावर आम्हाला अवश्य कळवा.’


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यामागे कार्यरत असलेला संकल्प !

‘जगभरातील साधकांचे आध्यात्मिक त्रास लवकर दूर व्हावेत, तसेच त्यांना देवतांच्या तत्त्वांचा अधिकाधिक लाभ व्हावा’, यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार आवश्यक नामजपांची निर्मिती करवून घेतली आहे. यात त्यांचा अप्रत्यक्ष संकल्पच कार्यरत झाला असल्याने या नामजपांनुसार साधकांनी नामजप केल्यास त्यांचे त्रास दूर होण्यास, तसेच त्यांना देवतांच्या तत्त्वांचा लाभ होण्यास निश्चितच साहाय्य होईल.’

– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, संगीत समन्वयक, फोंडा, गोवा.(१२.१२.२०२१)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजेमध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजेमंद आध्यात्मिक त्रास असणेहोय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक