आमदार चर्चिल आलेमाव यांना अपात्र ठरवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची सभापतींकडे मागणी

आमदार चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केल्याचे प्रकरण

आमदार चर्चिल आलेमाव

पणजी, १४ डिसेंबर (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ पक्ष तृणमल काँग्रेसमध्ये विलीन केल्याविषयी आमदार चर्चिल आलेमाव यांना आमदार या नात्याने अपात्र ठरवावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे केली आहे. हे विलिनीकरण अनधिकृत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सभापती राजेश पाटणेकर सध्या गोव्याबाहेर आहेत आणि १५ डिसेंबर या दिवशी ते गोव्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांची पुन्हा भेट घेणार असल्याचे डिसोझा यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘घटनेच्या १० व्या परिशिष्टाचा आधार घेत आमदार अपात्रता अर्ज प्रविष्ट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ गट विलीन करण्याची चर्चिल आलेमाव यांची कृती अनधिकृत आहे आणि यामुळे ते अपात्र ठरू शकतात.’’

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उपाध्यक्ष अविनाश भोसले म्हणाले, ‘‘गोवा विधानसभेत तृणमूल काँग्रेसचा विधीमंडळ गट अस्तित्वात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटाचे तृणमूल काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्यासाठी विधानसभेत तृणमूल काँग्रेसचा एकतरी आमदार असणे अपेक्षित होते. गट अस्तित्वात नसेल, तर ‘चर्चिल आलेमाव यांनी कुठल्या गटात विलिनीकरण केले ?’, असा प्रश्‍न उपस्थित होतो.’’