मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणार्‍यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस खंबीरपणे उभा आहे ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर शाई फेकल्याचे प्रकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई – सीमाभागातील मराठी भाषिकांचे हक्क जपणे, त्यांच्या अस्मितेचे रक्षण करणे आणि सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी उभे रहाणे, हे आमचे कर्तव्य आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणार्‍या कोणत्याही मराठी भाषिकावर झालेले आक्रमण खपवून घेतले जाणार नाही. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणार्‍या ‘मराठी सैनिका’च्या पाठीशी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस खंबीरपणे उभा आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’चे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे ‘कन्नड वेदिका रक्षण समिती’च्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. या प्रकाराचा अजित पवार यांनी वरील शब्दांत निषेध व्यक्त केला.

अजित पवार पुढे म्हणाले, ‘‘दळवी यांच्यावरील आक्रमण हे मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक आणि सुनियोजित केलेले आक्रमण आहे. या घटनेमुळे मराठी भाषिक चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही, उलट मराठी भाषेची चळवळ आणखी जोमाने उसळी घेऊन पुढे जाईल. या घटनेमुळे मराठी भाषिक एकत्र येऊन हा लढा आणखी तीव्र करतील. मराठीचा आवाज कदापि दबणार नाही. लढणे हे मराठी भाषिकांच्या रक्तातच आहे. जेवढा दाबण्याचा प्रयत्न होईल, तेवढी ही चळवळ आणखी उसळी घेईल.’’