सूरत (गुजरात) येथे ‘पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल’ आयोजित करणार्‍या उपाहारगृहावर  बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे आक्रमण

  • भारतात पाकचा झेंडा फडकावणे, भारत-पाक क्रिकेट सामन्यात पाकचा विजय झाल्यास फटाके फोडणे आणि पाक पराभूत झाल्यास दगडफेक करणे, अनेक ठिकाणी पाकच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणे, काश्मीरच्या नेत्यांकडून पाकचे गुणगाण गायले जाणे, पाकच्या नावे खाद्य महोत्सवाचे आयोजन करणे, अशा शत्रूराष्ट्राचा उदो उदो करणार्‍या घटनांचे कुठल्याही सरकारला काहीच वाटत नाही, हे लक्षात घ्या ! वरील प्रकार करणार्‍या राष्ट्रघातक्यांवर कारवाई होण्यासाठी राष्ट्रप्रेमींनो, संघटित व्हा ! – संपादक
  • शत्रूराष्ट्राचा उदो उदो करणार्‍यांना ‘देशद्रोही’ घोषित करून सरकारने त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक
बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी उपाहारगृहावर आक्रमण करून कापडी फलकाला आग लावली

सूरत (गुजरात) – येथील रिंगरोड भागात असणार्‍या एका उपाहारगृहात ‘पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आल्याने बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी या उपाहारगृहावर आक्रमण करून तोडफोड केली. यासह येथे लावण्यात आलेला एक कापडी फलकही काढून त्याला आग लावली. या उपाहारगृहात १२ डिसेंबरपासून ‘टेस्ट ऑफ इंडिया’ नावाचा एक महोत्सव चालू झाला आहे. २२ डिसेंबरपर्यंत चालणार्‍या या महोत्सवात ‘पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल’चेही आयोजन करण्यात आले होते.  संबंधित उपाहारगृहाने त्यांची चूक मान्य केली असल्याची माहिती बजरंग दलाच्या एका वरिष्ठ पदाधिकार्‍याने दिली.

१. बजरंग दलाच्या दक्षिण गुजरात विभागाचे अध्यक्ष देवीप्रसाद दुबे यांनी सांगितले की, उपाहारगृहात अशा प्रकारचे उत्सव आयोजित केले जाऊ दिले जाणार नाहीत.

२. ‘टेस्ट ऑफ इंडिया’ उपक्रम राबवणार्‍या ‘शुगर अँड स्पाईस रेस्टॉरंट्स’चे संचालक संदीप डावर यांनी सांगितले की, काही लोकांच्या भावना दुखावल्यामुळे संबंधित कार्यक्रमातून ‘पाकिस्तानी’ हा शब्द काढून टाकण्यात येईल. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.