मडगाव गोव्यातील विधानसभेची आगामी निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि मगोप यांची युती जिंकणार आहे. भाजपला हरवायचे असल्यास विरोधी पक्षांनी या युतीला पाठिंबा द्यावा. बंगालमध्ये ज्या पद्धतीने योजनाबद्धरित्या निवडणूक जिंकली, त्याप्रमाणे गोव्यासाठीही आमची विशेष योजना आहे. मी सर्व धर्म आणि जाती यांच्यासाठी काम करते, असा दावा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बाणावली येथे सभेत बोलतांना केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसीय गोवा भेटीवर आहेत.
आमदार चर्चिल आलेमाव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ गट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये केला विलीन
पणजी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी १३ डिसेंबर या दिवशी दुपारी विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांना पत्र सुपुर्द करून राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ गट तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर बाणावली येथे झालेल्या सार्वजनिक सभेत तृणमूलच्या सर्वेसर्वा तथा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांनी त्यांची कन्या वालांका आलेमाव यांच्यासह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर आमदार चर्चिल आलेमाव बाणावली मतदारसंघातून, तर वालांका आलेमाव या नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
या वेळी आमदार चर्चिल आलेमाव म्हणाले, ‘‘गोवा विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा मी एकमेव आमदार आहे आणि यामुळे १०० टक्के पक्ष माझा आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन करत आहे. राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्ठानुसार २/३ बहुमताने विधीमंडळ गट दुसर्या पक्षात विलीन करता येतो. मी आता तृणमूल काँग्रेसचा आमदार झालो आहे. काँग्रेसकडे युतीसाठी मी एक वर्ष वाट पाहिली. वर्ष २०१७ मध्येही मला काँग्रेसने डावलले, तरी मी स्वत:च्या सामर्थ्यावर निवडून आलो. देशाला तृणमूल काँग्रेस हाच एक पर्याय आहे.’