उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! पू. भार्गवराम भरत प्रभु हे या पिढीतील आहेत !
‘पूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गरुड पक्षी याग झाला. संगणकीय प्रणालीद्वारे हा याग पहात असतांना मंगळुरू येथील सनातनचे बालकसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ४ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि याग झाल्यानंतर रामनाथी आश्रमातील सूक्ष्म ज्ञान प्राप्तकर्त्या साधकांनी कथन केलेले सूक्ष्म परीक्षण यांत साम्य असल्याचे पू. भार्गवराम यांची आई सौ. भवानी प्रभु यांना लक्षात आले. त्याविषयीचे लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. रामनाथी आश्रमात गरुड पक्षी याग होत असतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मागे गरुड उभा आहे’, असे चित्र पू. भार्गवराम यांनी काढले.
२. पू. भार्गवराम यांनी सांगितले, ‘‘ येथे (मंगळुरू येथे) गरुड उडत आहे आणि तो उडत वर जात आहे. गरुडाने मोठा आवाज केला.’’ याग झाल्यानंतर आम्ही बाहेर जाऊन पाहिले, त्याच वेळी गरुड आकशात फिरताना दिसला. तसेच त्याच वेळी बाहेर पाऊस पडला.
३. गरुड उडतांना पंखांचा जसा आवाज होतो, तसा आवाज पू. भार्गवराम करून दाखवत होते. त्या वेळी मला वाटले, ‘त्या आवाजामुळे मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होत आहे.’
४. पू. भार्गवराम यांनी सांगितले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यावर तेजाचा (अग्नीचा) वर्षाव होत आहे.’’
५. गरुडाच्या मूर्तीला पाहून ते म्हणाले, ‘‘गरुडाने जसा नमस्कार केला आहे, तसा मीही करणार आहे.’’
६. काही दिवसांपूर्वी ‘एक गरुड पुष्कळ वेळ पू. भार्गवराम यांना न्याहाळत आहे’, असे पू. भार्गवराम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गरुडाला जवळ बोलावले. तेव्हा गरुड उडून जवळ आल्यावर पू. भार्गवराम यांनी सांगितले, ‘‘गरुडाच्या डोळ्यांतून अग्नी बाहेर पडत आहे.’’
याग झाल्यानंतर रामनाथी आश्रमातील सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी यागाविषयीचे सूक्ष्म परीक्षण सांगितले. या सूक्ष्म परीक्षणातील सूत्रे आणि पू. भार्गवराम यांनी याग पहात असतांना सांगितलेली सूत्रे यांत साम्य असल्याचे माझ्या लक्षात आले. ‘पू. भार्गवराम यांना तेजतत्त्वाची अनुभूती आली’, हे रामनाथी आश्रमातील सूक्ष्म-ज्ञान प्राप्तकर्त्या साधकांनी कथन केलेले सूक्ष्म परीक्षण ऐकून माझ्या लक्षात आले.’
– सौ. भवानी भरत प्रभु, मंगळुरू, कर्नाटक (९.९.२०२०)
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या / संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |