कराड, १२ डिसेंबर (वार्ता.) – येथील बुधवार पेठेत संरक्षक भिंतीसाठी नगरपालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून विराट चव्हाण (वय ४ वर्षे) या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्व खड्डे बुजवून पालिकेने या कामाला स्थगिती दिली आहे.
कराड नगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संरक्षक भिंतीचे काम चालू आहे. त्यासाठी ठेकेदार सत्यजितसिंह जगताप यांच्या वतीने समीर पटवेकर आणि खाजा मडकी हे सहठेकेदार म्हणून काम करत आहेत. संरक्षक भिंतीसाठी ७ फूट खड्डे खाणण्यात आले होते. या वेळी जलवाहिनी फुटल्यामुळे खड्डयात पाणी साचले होते. जवळच विराट चव्हाण आणि मुले खेळत होती. पाण्यात दगड मारतांना पाय घसरून विराट खड्ड्यात पडला, हे ‘सीसीटिव्ही’ चित्रणातून स्पष्ट झाले. विराटची आई रेश्मा चव्हाण यांच्या तक्रारीवरून तीनही ठेकेदारांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कराड नगरपालिकेनेही संबंधित ठेकेदारांनी काम करतांना नगरपालिकेची जलवाहिनी फोडून सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याविषयी पोलिसात तक्रार केली आहे.