कोल्हापूर येथे १४ ते १६ जानेवारी या काळात पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन !

प्रतिकात्मक छायाचित्र

संभाजीनगर, १२ डिसेंबर – गेल्या २ वर्षांच्या कोरोना संसर्गाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीत मानवी मूल्य आणि विश्वबंधुता यांच्या विचारांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे १४ ते १६ जानेवारी २०२२ या काळात पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालय या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी स्थापना वर्ष असल्याने ते महाविद्यालय सहआयोजकाच्या भूमिकेत आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव श्रीमंतराव शिसोदे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘‘संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, खुलीचर्चा, विविध राज्यांचे भक्तीसंगीत, असे कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. मदन महाराज गोसावी हे आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उद्घाटनासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. १४ जानेवारी या दिवशी संत बाळूमामा देवस्थान येथे बाळूमामांच्या समाधीची विधीवत् महापूजा होईल. १५ जानेवारी या दिवशी ह.भ.प. मदन महाराज गोसावी यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिरात पूजा होऊन नंतर ग्रंथ दिंडी निघेल.’’