‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
वादनाविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘गायन, वादन, नृत्य आदी कला ईश्वरप्राप्तीसाठी पूरक आहेत. कलेचा उपयोग ‘साधना’ म्हणून केल्यास ईश्वरी तत्त्वाची अनुभूती येते. बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांनी २०.१०.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. संतांनी (पू. गिंडे यांनी) केलेल्या बासरीवादनाचा साधक-श्रोत्यांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
(पू. गिंडे यांच्या बासरीवादनाचा त्यांच्या स्वतःवर झालेला परिणाम, त्यांच्या पारंपरिक बासरीवर आणि त्यांनी निर्मिलेल्या ‘केशववेणू’वर (टीप) झालेला परिणाम, तसेच त्यांचे बासरीवादन ऐकल्याने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यावर झालेला परिणाम यांचे संशोधन निराळ्या लेखात दिले आहे.)
टीप – पू. गिंडे यांनी संशोधन करून बनवलेल्या बासरीचे नाव ‘केशववेणू’ आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले ३ साधक, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळीचे २ साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले २ साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेले अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळीचे २ साधक असे एकूण ९ साधक श्रोते म्हणून सहभागी झाले.
१ अ. चाचणीतील प्रयोग : पू. गिंडे यांनी एकूण ५ प्रयोगांत पारंपरिक बासरी आणि त्यांनी दैवी पे्ररणेने बनवलेली ‘केशववेणू’ बासरी वाजवली. त्यांनी प्रत्येक प्रयोगात ४० मिनिटे बासरीवादन केले.
पहिला प्रयोग : त्यांनी पारंपरिक बासरीवर राग ‘तोडी’ वाजवला.
दुसरा प्रयोग : त्यांनी ‘केशववेणू’ बासरीवर राग ‘तोडी’ वाजवला.
तिसरा प्रयोग : प्रयोगात त्यांनी पारंपरिक बासरीवर राग ‘यमन’ वाजवला.
चौथा प्रयोग : प्रयोगात त्यांनी ‘केशववेणू’ बासरीवर राग ‘यमन’ वाजवला.
पाचवा प्रयोग : त्यांनी बासरीवर मांडखमाज, मालकंस आणि भैरवी रागावर आधारित भजने वाजवली.
३ र्या, ४ थ्या आणि ५ व्या प्रयोगांत श्री. गिरीजय प्रभुदेसाई यांनी तबल्याची साथ दिली.
प्रत्येक प्रयोगापूर्वी अन् प्रयोगानंतर साधक-श्रोत्यांची, श्री. गिरीजय प्रभुदेसाई आणि त्यांच्या वाद्याची (तबल्याची) ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.
२. पू. गिंडे यांच्या बासरीवादनाचा साधक-श्रोत्यांवर सकारात्मक परिणाम होणे
पू. गिंडे यांचे बासरीवादन ऐकल्याने पाचही प्रयोगांत साधकांतील नकारात्मक ऊर्जा अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली; पण त्यांचे प्रमाण निरनिराळे होते. चाचणीतील पाचही प्रयोगांतील सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर पुढील सूत्रे लक्षात आली.
२ अ. पारंपरिक बासरीवादनापेक्षा ‘केशववेणू’ बासरीवादनाचा सर्वच साधकांवर अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होणे
१. ‘प्रयोग क्र. १’ मधील पारंपरिक बासरीवादनापेक्षा ‘प्रयोग क्र. २’ मधील ‘केशववेणू’ बासरीवादन ऐकल्याने साधकांतील सकारात्मक ऊर्जेत अधिक प्रमाणात वाढ झाली.
२. ‘प्रयोग क्र. ३’ मधील पारंपरिक बासरीवादनापेक्षा ‘प्रयोग क्र. ४’ मधील ‘केशववेणू’ बासरीवादन ऐकल्याने साधकांतील सकारात्मक ऊर्जेत अधिक प्रमाणात वाढ झाली.
३. पू. गिंडे यांच्या बासरीवादनाला तबल्याची साथ देणारे तबलावादक श्री. गिरीजय प्रभुदेसाई यांच्यावर पारंपरिक बासरीवादनापेक्षा ‘केशववेणू’ बासरीवादनाचा अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम झाला. त्यांच्या तबल्यावरही सकारात्मक परिणाम झाला.
यातून पारंपरिक बासरीवादनापेक्षा ‘केशववेणू’ बासरीवादनाचा सर्वच साधकांवर अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम झाला, हे लक्षात येते.
२ अ १. वरील सूत्रांचे विश्लेषण : पू. गिंडे हे संत असल्याने त्यांनी केलेल्या बासरीवादनातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित झाले. त्यांचे बासरीवादन ऐकल्याने साधक-श्रोत्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले. सर्व वाद्यांमध्ये बासरी सर्वाधिक सात्त्विक वाद्य आहे. बासरीचा नाद आकाशतत्त्वाशी संबंधित असल्याने तिच्यातून उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. पारंपरिक बासरीच्या तुलनेत पू. गिंडे यांनी दैवी प्रेरणेने निर्मिलेली ‘केशववेणू’ बासरी अधिक सात्त्विक आहे. (याचे संशोधन निराळ्या लेखात दिले आहे.) यामुळे पू. गिंडे यांच्या पारंपरिक बासरीवादनाच्या तुलनेत ‘केशववेणू’ बासरीवादनातून अधिक प्रमाणात निर्गुण चैतन्य प्रक्षेपित झाले. यामुळे साधक-श्रोत्यांवर पारंपरिक बासरीवादनापेक्षा ‘केशववेणू’ बासरीवादनाचा अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम झाल्याचे चाचणीतील निरीक्षणांतून दिसून आले.
२ आ. साधकांवर प्रयोग क्र. २ चा सर्वाधिक सकारात्मक परिणाम होणे आणि त्या खालोखाल त्यांच्यावर उतरत्या क्रमाने प्रयोग क्र. १, ४, ३ आणि ५ यांचा सकारात्मक परिणाम होणे : बासरीतून निघणारा नाद आकाशतत्त्वाशी संबंधित असल्याने त्यातून उच्च स्तरावरील चैतन्य प्रक्षेपित होते. बासरी आणि तबला यांतून प्रक्षेपित होणार्या नादशक्तीच्या स्तरामध्ये भेद आहे. बासरीवादनाला तबल्याची साथ मिळाल्यावर चैतन्याचा स्तर थोडा पालटतो. बासरीवर भजन वाजवतांना त्यातील नादशक्तीला शब्दशक्तीची जोड मिळाल्याने चैतन्याचा स्तर अजून पालटतो, म्हणजे तो निर्गुणाकडून सगुणाकडे जातो. याचीच प्रचीती चाचणीतून पुढीलप्रमाणे आली.
१. साधकांवर प्रयोग क्र. २ चा (तबल्याची साथ नसलेल्या ‘केशववेणू’ बासरीवादनाचा) सर्वाधिक सकारात्मक परिणाम झाला. याचे कारण ‘केशववेणू’ बासरीवादनातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा स्तर सर्वाधिक उच्च होता.
२. साधकांवर प्रयोग क्र. १ (तबल्याची साथ नसलेल्या पारंपरिक बासरीवादनाचा), प्रयोग क्र. ४ (तबल्याची साथ असलेल्या ‘केशववेणू’ बासरीवादनाचा), प्रयोग क्र. ३ (तबल्याची साथ असलेल्या पारंपरिक बासरीवादनाचा) आणि प्रयोग क्र. ५ (तबल्याच्या साथीने बासरीवर भजन वाजवणे) यांचा उतरत्या क्रमाने सकारात्मक परिणाम झाला. याचे कारण त्या त्या प्रयोगांत चैतन्याचा स्तर उतरत्या क्रमाने पालटत गेला.
थोडक्यात, पाचही प्रयोगांत संतांनी (पू. गिंडे यांनी) केलेल्या बासरीवादनातून चैतन्य प्रक्षेपित झाले आणि साधक-श्रोत्यांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला; पण त्याचे प्रमाण निरनिराळे होते, हे या चाचणीतून सिद्ध झाले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.१०.२०२१)
ई-मेल : [email protected]