(म्हणे) ‘भारतीय सैनिकांचे हात रक्ताने रंगवत आहेत !’

‘ग्लोबल टाइम्स’कडून संरक्षणतज्ञ ब्रह्मा चेलानी यांच्यावर पुन्हा टीका

भारताच्या संरक्षणतज्ञाने केलेल्या दाव्यानंतर चीनला मिरच्या झोंबल्याने त्याच्याकडून थयथयाट केला जात आहे, हेच यातून स्पष्ट होते ! त्यामुळे ‘या अपघातामागे चीन आहे’, असे कुणी परत परत म्हणत असेल, तर त्या दाव्याला चुकीचे कसे म्हणता येईल ? असा प्रश्न उपस्थित होतो ! – संपादक 

बीजिंग (चीन) – भारताच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत यांच्या आणि चीनचा प्रखर विरोधक असलेल्या तैवानचे सैन्यदलप्रमुख यांच्या अपघातांमध्ये साम्य आहे, असा दावा भारताचे संरक्षणतज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी केल्यावर चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने टीका केली होती. त्यानंतर या मुखपत्राने पुन्हा चेलानी यांच्यावर गरळओक केली आहे. ‘अशा प्रकारच्या कटाच्या दाव्याला प्रोत्साहन देऊन चेलानी भारतीय सैनिकांचे हात रक्ताने रंगवत आहेत’, असे या दैनिकाने म्हटले आहे.

ग्लोबल टाइम्सने म्हटले की, भारतामध्ये ‘तथाकथित विद्वान’ बह्मा चेलानी चीन-भारत संबंधामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करून या दुर्दैवाचा लाभ उठवत आहेत. चेलानी भारताला चुकीच्या दिशेने नेत आहेत. भारताला मागे खेचत आहेत. चेलानी आणि त्यांच्यासारख्या अन्य भारतियांनी लक्षात ठेवले पाहिजे की, अपघात झालेले हेलिकॉप्टर भारताचे होते अन् ते त्यांच्या प्रमुखाला वाचवण्यात अयशस्वी ठरले. असे अपघात दुर्मिळ असतात. तरीही अशी घटना घडली यावरून चीन नाही, तर भारत स्वतःच स्वतःचा शत्रू आहे. चेलानीसारखे लोक चीन-भारत संबंध सुधारण्यास कोणतीही भूमिका बजावत नाहीत आणि विकासामध्येही योगदान देत नाहीत. उलट भारताला आणि त्याच्या शेजार्‍यांना ते अडचणीमध्ये टाकत आहेत.