‘५.१२.२०२१ दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, हेमंतऋतू, मार्गशीर्ष मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.
(साभार : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. कल्पादि : मार्गशीर्ष शुक्ल पक्ष नवमी या तिथीला ‘कल्पादि योग’ होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे.
२ आ. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्धयोग होतो. दग्धयोग हा अशुभयोग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. १३.१२.२०२१ या दिवशी सोमवार असून रात्री ९.३३ नंतर एकादशी तिथी असल्याने दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्यंत ‘दग्धयोग’ आहे.
२ इ. मोक्षदा एकादशी : मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील एकादशीला ‘मोक्षदा एकादशी’ म्हणतात. या दिवशी विष्णूच्या दामोदर रूपाची पूजा करतात. या एकादशीच्या व्रताने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मोक्ष मिळतो. या दिवशी ‘एकादशी माहात्म्य’ आणि ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ यांचे वाचन करतात. १४.१२.२०२१ या दिवशी ‘मोक्षदा एकादशी’ आहे.
२ ई. गीताजयंती : ‘मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशामृतरूपी गीता सांगितली’, असे मानले जाते; म्हणून या दिवशी गीताजयंती साजरी केली जाते. या निमित्ताने गीतेवर आधारित प्रवचने, गीतापठण असे कार्यक्रम केले जातात. १४.१२.२०२१ या दिवशी गीताजयंती आहे.
२ उ. अमृतयोग : नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने ‘अमृतयोग’ किंवा ‘अमृतसिद्धीयोग’ होतो. रविवारी हस्त नक्षत्र, सोमवारी मृग नक्षत्र, मंगळवारी अश्विनी नक्षत्र, बुधवारी अनुराधा नक्षत्र, गुरुवारी पुष्य नक्षत्र, शुक्रवारी रेवती नक्षत्र आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असेल, तर ‘अमृतयोग’ किंवा ‘अमृतसिद्धीयोग’ होतो. अमृतयोगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते.
१. मंगळवार, १४.१२.२०२१ या दिवशी उत्तररात्री ४.४० पर्यंत अश्विनी नक्षत्र असल्याने अमृतयोग आहे; परंतु मंगळवारी अश्विनी नक्षत्र आल्याने जो अमृतसिद्धीयोग होतो तो गृहप्रवेशास वर्ज्य करावा.
२. शनिवार, १८.१२.२०२१ या दिवशी दुपारी १.४८ पर्यंत रोहिणी नक्षत्र असल्याने अमृतयोग आहे; परंतु शनिवारी रोहिणी नक्षत्र आल्याने जो अमृतसिद्धीयोग होतो, तो प्रयाणास वर्ज्य करावा.
२ ऊ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १४.१२.२०२१ या दिवशी रात्री ११.३६ पासून उत्तररात्री ४.४० पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ए. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. १४.१२.२०२१ या दिवशी सकाळी १०.३१ पासून रात्री ११.३६ पर्यंत आणि १८.१२.२०२१ या दिवशी सकाळी ७.२५ पासून रात्री ८.४६ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ऐ. बृहस्पतिप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. गुरुवारी येणार्या प्रदोष तिथीला ‘बृहस्पतिप्रदोष’ किंवा ‘गुरुप्रदोष’ म्हणतात. १६.१२.२०२१ या दिवशी बृहस्पतिप्रदोष आहे. ‘बृहस्पतिप्रदोष’ हे व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो’, असे मानले जाते. ‘प्रदोष’ या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे, तसेच शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.
२ ओ. यमघंटयोग : वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने ‘यमघंटयोग’ होतो. रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंटयोग’ होतो. हा अनिष्टयोग आहे. प्रवासासाठी हा योग पूर्णतः वर्ज्य करावा. गुरुवार, १६.१२.२०२१ या दिवशी सकाळी ७.३५ नंतर कृत्तिका नक्षत्र असल्याने दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्र्यंत आणि शुक्रवार, १७.१२.२०२१ या दिवशी सकाळी १०.४० नंतर रोहिणी नक्षत्र असल्याने दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्र्यंत यमघंटयोग आहे.
२ औ. श्री दत्तात्रेय जयंती : मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्रिऋषींच्या आश्रमात ब्रह्मा, विष्णु आणि महेश या देवतांचा एकत्रित असा श्री दत्तात्रेयांचा अवतार झाला; म्हणून या पौर्णिमेला श्री दत्तजयंती साजरी केली जाते. प्रदोषकाळी असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी श्री दत्तजयंती असते. (सूर्यास्तानंतरच्या ३ मुहूर्तांच्या (२ घंटे २४ मिनिटे) कालावधीस ‘प्रदोषकाल’ म्हणतात.) या निमित्ताने श्री गुरुचरित्राचे पाठ / सप्ताह करून श्री दत्तात्रेयांची उपासना केली जाते. गाणगापूरक्षेत्री श्री दत्तजयंती उत्सव साजरा केला जातो. १८.१२.२०२१ या दिवशी सकाळी ७.२५ पासून १९.१२.२०२१ या दिवशी सकाळी १०.०६ पर्यंत पौर्णिमा तिथी आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.१२.२०२१)
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.
टीप २ – दग्धयोग, एकादशी, अमृतयोग, घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण), प्रदोष, आग्रहायणी, कुलधर्म आणि अन्वाधान यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. |