रथोत्सवाला अनुमती नाही
सातारा, ९ डिसेंबर (वार्ता.) – येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिराचा वार्षिक महोत्सव आणि रथोत्सव १५ डिसेंबरपासून चालू होत आहे. २० डिसेंबरपर्यंत चालणार्या या महोत्सवामध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे; मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही प्रशासनाकडून रथोत्सवाला अनुमती देण्यात आलेली नाही, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग यांनी दिली.
१५ डिसेंबर या दिवशी पहाटे ५ वाजता ध्वजारोहण आणि प्रधान संकल्प करून महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. १६ डिसेंबर या दिवशी सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत पुण्याहवाचन, गणपति होम आणि गृह होम होऊन सायंकाळी ६ वाजता राधाकृष्ण यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. १७ डिसेंबर या दिवशी गणपति होम, घटस्थापना, होम, जप आणि महाआरती होणार आहे. १८ डिसेंबर या दिवशी गणपति होम, घटस्थापन, होम, जप, महाआरती आणि सायंकाळी दीपोत्सव होणार आहे, तसेच मंदिराच्या प्रांगणात रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे. १९ डिसेंबर या दिवशी मूर्ती यात्रा आणि रुद्र होम संपन्न होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत प्रतिदिन गणपति होम, मूलमंत्र जप, होम, महाआरती होणार आहे.
या कार्यक्रमांसाठी समाजातून देणगी स्वीकारली जाणार आहे. तरी भाविकांनी तन-मन-धन अर्पण करून या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.