चीनचा प्रखर विरोधी असलेल्या तैवानचे सैन्यदलप्रमुख आणि बिपिन रावत या दोघांच्या हेलिकॉप्टर अपघातांमध्ये साम्य !

संरक्षणतज्ञांकडून चीनच्या भूमिकेवरून प्रश्‍न उपस्थित

(डावीकडे) भारताचे सीडीएस् बिपिन रावत (उजवीकडे) तैवानचे सैन्यदलप्रमुख शेन यी मिंग

तायपे (तैवान) – भारताचे पहिले सीडीएस् (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) म्हणजे तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख असलेले जनरल बिपिन रावत यांचा तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. अशाच प्रकारचा हेलिकॉप्टर अपघात चीनचा विरोधक असणार्‍या तैवानचे सैन्यदलप्रमुख शेन यी मिंग यांचा झाला होता आणि त्यात त्यांचाही मृत्यू झाला होता. संरक्षण तज्ञ आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून या दोन्ही अपघातांची तुलना केली जात आहे. जानेवारी २०२० मध्ये शेन यी मिंग यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. मिंग यांचे ‘ब्लॅक हॉक’ हेलिकॉप्टर तायपेई भागाजवळच्या डोंगराळ भागात कोसळले होते. ‘ब्लॅक हॉक’ हे  हेलिकॉप्टर अमेरिकानिर्मित सर्वांत आधुनिक आणि सुरक्षित हेलिकॉप्टर्सपैकी एक मानले जाते.

भारतातील संरक्षण तज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची तुलना तैवानच्या सैन्यदलप्रमुखांच्या अपघाताशी केली. ‘चिनी आक्रमकतेविरुद्ध लढणार्‍या संरक्षण विभागातील प्रमुख व्यक्तीला हेलिकॉप्टर अपघातांत प्राण गमवावे लागत आहेत. या दोन्ही अपघातांमधील समानतेचा अर्थ आहे की, यांत काहीतरी संबंध आहे किंवा यांत बाहेरील शक्तींचा हात आहे’, असे चेलानी यांनी म्हटले आहे.

(म्हणे) ‘जनरल रावत यांच्या अपघातामागे अमेरिकाही असू शकते !’ – चीनच्या सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’चा कांगावा

बीजिंग (चीन) – ब्रह्मा चेलानी यांनी जनरल बिपिन रावत आणि तैवानचे सैन्यदलप्रमुख शेन यी मिंग यांच्या हेलिकॉप्टर अपघातांमध्ये समानता असल्याचे आणि दोघेही चीनविरोधक असल्याचे म्हटल्यावर चीनचे सरकारी दैनिक ‘ग्लोबल टाइम्स’ने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ग्लोबल टाइम्स’ने याविषयी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जर असे असेल, तर जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूच्या मागे अमेरिकेचा हातही असू शकतो. कारण भारत आणि रशिया हे एस्-४०० क्षेपणास्त्र प्रणालीसंबंधी करार करत होते आणि अमेरिका या कराराला विरोध करत होती.

‘ग्लोबल टाइम्स’चे विधान चीनच्या प्रशासनाची भ्रष्ट मानसिकता दाखवते ! – ब्रह्मा चेलानी

भारतातील संरक्षण तज्ञ ब्रह्मा चेलानी

‘ग्लोबल टाइम्स’ने केलेल्या या ट्वीटवर ब्रह्मा चेलानी यांनी लगेच प्रत्युत्तर देत ट्वीट केले आहे की, चीनचे सरकारी मुखपत्र कशाप्रकारे माझ्या ट्वीटवर अपसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि रावत यांच्या अपघातामागे अमेरिका असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हे पहा ! हे ट्वीट चीनच्या प्रशासनाची भ्रष्ट मानसिकता दाखवते.

चेलानी यांनी दुसर्‍या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, स्पष्टपणे विचार करण्यास सक्षम आणि स्पष्टवक्ते जनरल रावत चीनच्या आक्रमकतेच्या विरोधात भारताचा चेहरा बनले होते. जेथे राजकीय नेतृत्व चीनचे नाव घेण्यासही टाळत होते, तेथे रावत उघडपणे लोकांना चीनचा चेहरा दाखवत होते. त्यामुळे जनरल रावत यांच्या जाण्याची भरपाई करणे सोपे नाही.