पुरातन मंदिरांसह इतर ऐतिहासिक वास्तूंचे जतन केलेच पाहिजे ! – डॉ. राहुल देशपांडे, मंदिर अभ्यासक

‘जाऊ देवाचिया गावा’ या विषयावर डॉ. राहुल देशपांडे यांनी बारामतीकरांशी संवाद साधला

बारामती (जिल्हा पुणे) – मंदिर म्हणजे ब्रह्मांड, भारतीय तत्त्वज्ञान आणि मौखिक परंपरा यांचा संगम आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील मंदिरे हा आपला वैभवशाली वारसा आहे, या पुरातन मंदिरांसह इतर ऐतिहासिक वास्तूंचे जतन केलेच पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून विविध मंदिरांचा अभ्यास करणारे डॉ. देशपांडे परिवर्तन व्याख्यानमालेच्या निमित्ताने बारामतीकरांच्या भेटीस आले होते. येथील ‘अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ आणि भगिनी मंडळ यांच्या वतीने परिवर्तन व्याख्यानमालेच्या अंतर्गत ‘जाऊ देवाचिया गावा’ या विषयावर देशपांडे यांनी बारामतीकरांशी संवाद साधला.

प्रामुख्याने बारामती पंचक्रोशीतील विविध मंदिरांमध्ये असलेल्या रचना आणि त्यातील वेगळेपण, तसेच त्याचे ऐतिहासिक महत्त्व याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. मंदिराचा इतिहास काय आहे ?, त्या मागील विज्ञान नेमके कसे असते ? आणि पूर्वजांनी जी काही रचना केली आहे त्यामागे त्यांचा कसा दृष्टीकोन होता  ? याचे अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी केले.

डॉ. देशपांडे म्हणाले, ‘‘मंदिर म्हणजे अभिजात कला, शास्त्र आणि नियम, संवेदना, सम्यक अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विज्ञान, रुढी आणि अव्यक्त विचारप्रणाली या सर्वांचा सुरेख संगम असतो. देवाचे अस्तित्व चराचरात आहे आणि त्याला ते सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. बारामती तालुक्यातील अनेक गावांतून मंदिरांचा संपन्न वारसा आहे, इतिहासाच्या खुणा जागवणारा हा ऐतिहासिक वारसा जतन केला पाहिजे.’’