मुंबईतील सागरी मार्गाच्या कामांमध्ये घोटाळा !

भाजपचे आमदार आशिष शेलार यांचा आरोप !

डावीकडून आशिष शेलार आणि उद्धव ठाकरे

मुंबई – मुंबईतील सागरी मार्ग प्रकल्पामध्ये पुष्कळ प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे शेलार यांनी हा आरोप केला आहे.

आशिष शेलार पुढे म्हणाले की, सागरी मार्गाच्या प्रकल्पात मुंबई महानगरपालिका ठरवून अफरातफर करत आहे. प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांना अवैध साहाय्य केले आहे. महापालिकेने हे आरोप फेटाळून लावले आहे; मात्र कॅगने अहवालात अवैधरित्या देयके दिली जात असल्याचे नमूद केले आहे. मुंबईकरांच्या पैशांची लूट केली जात आहे. हा सगळा प्रकार भ्रष्टाचाराच्या दिशेने जात आहे.

‘सागरी मार्गाच्या जागेवर अतिक्रमण होणार नाही, यासाठीचा ‘प्रिव्हेंशन प्लॅन’ केंद्राने मागितला होता; परंतु ३२ मासांनंतरही याला उत्तर देण्यात आले नाही. यामागचा छुपा अजेंडा काय आहे ? हे नव्याने सिद्ध होणार्‍या जागेवर दुसरे काहीतरी अनधिकृत करण्याचे नियोजन महापालिकेचे नाही ना ?’ यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.