अधिकाधिक साधना करण्याचा ध्यास असलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या पू. (श्रीमती) विजया नीलकंठ दीक्षित (वय ८९ वर्षे) !

बेळगाव येथील श्रीमती विजया नीलकंठ दीक्षित (पू. (कै.) डॉ. नीलकंठ अमृत दीक्षित यांच्या पत्नी आणि रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. अंजली यशवंत कणगलेकर यांच्या आई) या १७.११.२०२१ या दिवशी सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या. त्यानिमित्त त्यांची मुलगी, जावई आणि नातू यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. (श्रीमती) विजया दीक्षित

सौ. अंजली यशवंत कणगलेकर (मुलगी)

१. सेवाभावी वृत्ती : ‘माझ्या बाबांचे (पू. (कै.) डॉ. नीलकंठ अमृत दीक्षित यांचे) वेगवेगळ्या ठिकाणी स्थानांतर व्हायचे. काही वेळा त्यांना लहान गावातही रहावे लागायचे. ते ज्या ज्या ठिकाणी राहिले, त्या ठिकाणी माझ्या आईने त्यांच्या बरोबरीने समाजकार्य करण्यात पुढाकार घेतला आणि निरपेक्ष वृत्तीने सेवा केली. त्या वेळी आईने प्रत्येक गावात महिलामंडळ स्थापन करून महिलांचे संघटन केले. आईने महिलांचे प्रबोधन करून त्यांच्यात धार्मिकतेचे बीज रोवले. आई-वडिलांचे ते रहात असलेल्या ठिकाणीही सर्वांशी घरोब्याचे संबंध होते आणि आईचे अजूनही आहेत. आई अडचणीत असलेल्या व्यक्तींना साहाय्य करायची. कोणाच्या घरची मंडळी गावी गेली असल्यास आणि त्यांची मुले घरात असल्यास आई त्यांच्या जेवणाची सोय करत असे.

२. प्रेमळ स्वभावामुळे सर्वांना आधार वाटणे : पू. बाबा डॉक्टर होते. त्यामुळे आईची ‘डॉक्टरीणबाई’ अशी ओळख आहे, तरीही उभयतांना या गोष्टीचा कधी मोठेपणा वाटला नाही. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ या उक्तीप्रमाणे जीवन जगल्याने त्या दोघांनी समाजात एक आदराचे स्थान निर्माण केले. आईचा अनासक्त आणि प्रेमळ स्वभाव असल्याने सगळ्यांना तिचा आजही आधार वाटतो. काही अडचणी असल्यास लोक हक्काने आईला सांगतात आणि ‘काय करावे ?’, याविषयी विचारूनही घेतात.’

आश्रमात येण्याची तळमळ 

पू. बाबांच्या देहत्यागानंतर १ वर्ष आई कुठेही गेली नाही. तिला आधी आश्रमात यायचे आहे.  ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राची पूजा करतांना आणि दिवसभरात अनेक वेळा ‘मला आश्रमात रहायला यायचे आहे. मला लवकर बोलवून घ्या’, अशी प्रार्थना करते.
– सौ. अंजली यशवंत कणगलेकर.

 

श्री. यशवंत कणगलेकर (जावई)

१. पहाटे उठून नामजप करणे : ‘पहाटे उठून नामजप करणे आणि मानसपूजा करणे’, ही सासूबाईंच्या आवडीची साधना आहे. अनेक वर्षे त्या ही साधना करत असल्यामुळे त्यांच्या तोंडवळ्यावर एक प्रकारचे तेज जाणवते. त्या आनंदीही दिसतात.

२. सेवाभाव : पू. दीक्षितआजोबा (सासरे) यांनी देहत्याग करण्यापूर्वी ते ८ वर्षे झोपूनच होते. संधीवातामुळे त्यांचे सांधे आखडल्याने त्यांना काही करता यायचे नाही. सासूबाईंनी त्यांची मनोभावे सेवा केली.

३. पतीनिधनाच्या प्रसंगातही त्या खंबीर आणि स्थिर राहिल्या.

सौ. अंजली कणगलेकर, डॉ. अंजेश (मोठा नातू) आणि श्री. सत्यकाम कणगलेकर (धाकटा नातू)

१. ‘वयाच्या नव्वदीत पदार्पण करूनही आई (पू. (श्रीमती) दीक्षितआजी) सतत उत्साही आणि आनंदी असते.

२. पू. दीक्षितआजोबांच्या देहत्यागानंतर आईमध्ये जाणवलेले पालट

अ. ‘आईचा तोंडवळा तेजस्वी दिसतो आणि तिच्या तोंडवळ्यावर गुलाबी रंगाची छटा आली आहे.

आ. आई पुष्कळ शांत आणि स्थिर झाली आहे.

इ. तिची साधना करण्याची तळमळ पहिल्यापेक्षा पुष्कळ वाढली आहे.

ई. ‘तिला आश्रमात येऊन रहावे’, असे वाटू लागले आहे. सध्या ती अधिक आनंदी दिसते.

उ. तिच्या परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीच्या श्रद्धेत वृद्धी झाली आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ३.११.२०२१)